WhatsApp वापरणाऱ्यांसाठी एक मोठी आणि प्रायव्हसी वाढवणारी अपडेट आली आहे. आता लवकरच कोणाशीही चॅट करण्यासाठी मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज भासणार नाही. कारण WhatsApp युझर्ससाठी Username फीचर आणत आहे.

या फीचरमुळे प्रत्येक युझर स्वतःसाठी एक युनिक Username निवडू शकेल. त्यानंतर नवीन व्यक्तींशी संवाद साधताना मोबाईल नंबरऐवजी फक्त Username शेअर करून चॅट सुरू करता येईल. त्यामुळे वैयक्तिक नंबर अनोळखी लोकांपर्यंत जाण्याचा धोका कमी होणार आहे.
हे फीचर विशेषतः ऑफिस नेटवर्किंग, कॉलेज ग्रुप्स, सोसायटी किंवा इतर सार्वजनिक ग्रुप्समध्ये उपयोगी ठरणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे Instagram किंवा X प्रमाणे WhatsApp वर कोणतीही Public Directory नसेल. म्हणजेच, समोरच्या व्यक्तीला तुमचं अचूक Username माहिती असेल, तरच ती तुम्हाला संपर्क करू शकेल.
सुरक्षिततेसाठी WhatsApp Username Key नावाचं अतिरिक्त फीचरही आणत आहे. पहिल्यांदाच एखादी अनोळखी व्यक्ती Username द्वारे संपर्क साधत असेल, तर हा सिक्युरिटी कोड टाकावा लागू शकतो. हा कोड तुम्ही कधीही बदलू शकता.

Username Reserve कसं करायचं? सर्वप्रथम WhatsApp अपडेट करा. त्यानंतर Settings > Account > Username या पर्यायात जाऊन तुमचं आवडतं आणि उपलब्ध Username निवडा आणि Confirm करा. हे Username जास्तीत जास्त 35 अक्षरांचं असू शकतं.
या फीचरमुळे तुमच्या जुन्या चॅट्स किंवा कॉन्टॅक्ट्सवर कोणताही परिणाम होणार नाही. मोबाईल नंबरद्वारे आधीसारखंच चॅटिंग सुरू राहील. तसेच End-to-End Encryption, Block आणि Report यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्यंही पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.

सध्या हे फीचर टप्प्याटप्प्याने रोलआउट होत आहे. त्यामुळे सर्व युझर्सना ते एकाच वेळी दिसणार नाही. तुमच्या अकाउंटवर हे फीचर उपलब्ध होताच WhatsApp कडून In-App Notification मिळेल.