आजपर्यंत फायर इंजिनचं स्टेअरिंग पुरुष चालकांच्या हाती दिसायचं..पण आता ही परंपरा बदलली आहे. मुंबईत एक ऐतिहासिक क्षण घडलाय. मुंबई अग्निशमन दलात प्रथमच एका महिलेने फायर इंजिन चालक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

या धाडसी महिलेचं नाव आहे पल्लवी पाटील. गेली आठ वर्ष त्या अग्निशमन दलात ‘फायर वुमन’ म्हणून काम बघतायत..पण त्यांना नेहमीच काहीतरी आव्हानात्मक करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी अवजड वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि पुढे फायर इंजिन ड्रायव्हर होण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळया परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्णही केल्या. विशेष म्हणजे, फायर इंजिनचं स्टेअरिंग हातात घेतल्यानंतर त्यांनी आतापर्यंत तीन आपत्कालीन कॉल्सही अटेंड केलेत.

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात, अरुंद रस्ते आणि रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे फायर इंजिन चालवणं हे मोठ्ठं आव्हान असतं. तरीही पल्लवी पाटील यांचा विश्वास ठाम आहे, की “आत्मविश्वास असेल तर अशक्यही शक्य आहे.” त्या म्हणतात अग्निशमन दलाची नोकरी धोकादायक असली तरी आयुष्यात जोखीम घेतल्याशिवाय मोठं यश मिळत नाही. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडतायत आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी अग्निशमन दलात काम करणं हा अभिमानाचा क्षण आहे. खरंच,,,, पल्लवी पाटील यांची ही कामगिरी अनेक महिलांसाठी आज प्रेरणेचा नवा मार्ग ठरतेय..