
पुणे, पुणेकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला अखेर मुहूर्त मिळाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा टप्पा तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग हा पुण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जातो. या मार्गाची एकूण लांबी सुमारे 23.2 किलोमीटर असून तो पूर्णपणे उन्नत अर्थात एलिव्हेटेड स्वरूपाचा आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारला जाणारा हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प आहे.
या मार्गावरील पहिल्या टप्प्यात 12 स्थानकांचा समावेश आहे. हा टप्पा यापूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र काही कामे अपूर्ण असल्यामुळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले होते. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी 30 जूनपर्यंत मेट्रो सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे.
दरम्यान, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके 15 जुलैपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर पुढील दीड ते दोन महिन्यांत संपूर्ण मार्गावरील 23 स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचे नियोजन आहे.
हिंजवडी परिसर हा पुण्याचा प्रमुख आयटी हब मानला जातो. येथे हजारो कर्मचारी रोज प्रवास करतात. तसेच या मार्गावर अनेक व्यावसायिक केंद्रे, मॉल्स आणि निवासी भाग असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.
सुमारे 8 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात टाटा समूहाची टीआरआयएल आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स यांची भागीदारी आहे. त्यामुळे आता पहिला टप्पा सुरू होण्याच्या हालचालींमुळे पुणेकरांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

