महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नभेसळ आणि नियमभंगाविरोधात कारवाई सुरू असतानाच FDAमधील काही अधिकाऱ्यांवर कथित वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंढेंना तीन पानी पत्र लिहून या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंढे FDA आयुक्त झाल्यानंतर कारवाईचा वेग वाढल्याचं राऊत यांनी पत्रात मान्य केलं आहे. मात्र, याच कारवाईची भीती दाखवून काही अधिकारी हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्विक-कॉमर्स कंपन्यांकडून पैसे वसूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘परवाना निलंबित करण्याची धमकी देऊन वसुली’
राऊत यांच्या दाव्यानुसार, पूर्वी क्लोजिंग नोटीससाठी 10 ते 12 हजार रुपये मागितले जात असल्याची चर्चा होती. आता हा कथित दर 75 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ठाण्यात 17 ते 18 लाखांची वसुली?
राऊत यांच्या पत्रातील सर्वात गंभीर आरोप ठाणे FDA कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांबाबत आहे. एका क्विक-कॉमर्स कंपनीचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी 17 ते 18 लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.
सोशल मीडिया पोस्टवरून कारवाईचा आरोप
एका हॉटेलमध्ये उंदीर असल्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्या हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. प्रत्यक्ष तपासणीत उंदीर आढळला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ग्राहकांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यापूर्वी तक्रारीची पडताळणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसंच, छोट्या खाद्य व्यवसायांवर कारवाई होत असताना मोठ्या कंपन्यांकडून होणाऱ्या नियमभंगाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
राऊतांची काय मागणी?
FDAच्या वांद्रे, ठाणे आणि इतर कार्यालयांमधील कथित क्लोजिंग नोटीस रेट कार्डची चौकशी करावी, ग्राहकांच्या तक्रारींची स्वतंत्र पडताळणी करावी आणि कायदेशीर प्रक्रिया न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. ठाण्यातील 17 ते 18 लाखांच्या कथित वसुलीचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, मुंढेंच्या नेतृत्वाखाली FDAकडून सुरू असलेल्या कारवाईवर यापूर्वीही चर्चा झाली आहे. आता राऊतांच्या आरोपांवर FDA आणि तुकाराम मुंढे काय भूमिका घेतात, तसेच वसुलीच्या आरोपांची चौकशी होते का, याकडे लक्ष लागलं आहे.

