जगभरातले वैज्ञानिक गेली अनेक वर्षं जंगलांमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचा शोध घेतायत. पण तब्बल 100 वर्षांपासून त्यांच्या नजरेतून सुटलेली एक छोटीशी जंगली मांजर आता समोर आली आहे. विशेष म्हणजे ही मांजर आपल्या घरात असणाऱ्या सामान्य मांजरीपेक्षाही आकाराने लहान आहे. दक्षिण अमेरिकेतल्या बोलिव्हियाच्या जंगलात सापडलेल्या या मांजरीला वैज्ञानिकांनी एक स्वतंत्र आणि नवी प्रजाती म्हणून ओळख दिली आहे. तिचं नाव आहे लेपर्डस टिलकायो (Leopardus tilcayo)

या शोधाची माहिती करंट बायोलॉजी या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैज्ञानिकांच्या मते, जंगली मांजराची अशी पूर्णपणे नवी प्रजाती समोर येणं ही खूपच दुर्मीळ घटना आहे. कारण बहुतांश वेळा नवीन सापडणारे प्राणी हे छोटे कीटक किंवा इतर लहान जीव असतात. पण यावेळी चक्क मांजराच्या कुटुंबातला एक नवा सदस्य सापडलाय.
घरचं मांजराचं पिल्लू समजून माणसाने घरी नेलं!

बरं या शोधामागची गोष्ट सुद्धा एखाद्या सिनेमासारखी आहे. बोलिव्हियातल्या ला पाझजवळच्या जंगलात राहणाऱ्या एका व्यक्तीला एक छोटंसं मांजर दिसलं. त्याने ते साधं मांजराचं पिल्लू समजून घरी नेलं. एवढंच नाही, तर त्याला नूडल्स, भात आणि अंडीही खायला दिली! पण, काही दिवसांनी हा प्राणी साधा पाळीव मांजर नसून जंगली असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याने त्या मांजराला सेंडा व्हेर्डे वाइल्डलाइफ सँक्च्युरीमध्ये आणून सोडलं.
इथे काम करणाऱ्या संशोधक पाओला नोगालेस-अस्कारुन्झ यांनी त्या मांजराला पाहिलं आणि त्या थक्कच झाल्या. कारण आकाराने ते अत्यंत लहान होतं. सुरुवातीला इतर संशोधकांना ही ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या टायगर कॅटची एखादी प्रजाती असावी असं वाटलं. पण पाओला यांना तिच्या अंगावरच्या ठिपके आणि शेपटीमध्ये काहीतरी वेगळेपण जाणवलं.
DNA टेस्टमध्ये समोर आलं 14 लाख वर्षांचं रहस्य!

यानंतर संशोधकांनी या मांजराची आणि त्याच सँक्च्युरीमध्ये आलेल्या आणखी एका अशाच मांजराची जेनेटिक टेस्ट केली. त्यातून दोन्ही मांजरी एकाच, पण विज्ञानासाठी आतापर्यंत अज्ञात असलेल्या स्वतंत्र प्रजातीतील असल्याचं समोर आलं. आश्चर्य म्हणजे ही प्रजाती इतर टायगर कॅट्सपासून जवळपास 14 लाख वर्षांपूर्वी वेगळी झाली होती. इतकी वर्षं ती जंगलात अस्तित्वात होती, पण वैज्ञानिकांना तिची स्वतंत्र ओळख पटली नव्हती. यापूर्वी म्युझियममध्येही या प्रजातीचे नमुने उपलब्ध नव्हते. या मांजरीचं शरीर सडपातळ असून अंगावर आकर्षक ठिपके आणि गोलाकार कान आहेत. ती बोलिव्हियातल्या युंगास या ढगांनी वेढलेल्या जंगलात आढळते. अँडीज पर्वतरांगा आणि ॲमेझॉनच्या परिसराला जोडणारा हा भाग जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.
वैज्ञानिकांसाठी नवी; पण स्थानिक लोकांसाठी जुनी ओळख!

या शोधातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे स्थानिक लोकांना या मांजरीबद्दल अनेक पिढ्यांपासून माहिती होती. ते तिला टिलकायो याच नावाने ओळखतात. वैज्ञानिकांनीही स्थानिक लोकांच्या पारंपरिक ज्ञानाचा आदर राखत नव्या प्रजातीला हेच नाव दिलं. मात्र, आता या मांजरीसमोर एक मोठं संकट आहे. जंगलात अशा किती मांजरी शिल्लक आहेत, याची माहिती अद्याप वैज्ञानिकांकडे नाही. शेती, वाढती बांधकामं आणि जंगलांचा नाश यामुळे टायगर कॅट्सच्या अधिवासाला धोका निर्माण होत आहे. म्हणूनच हा शोध जितका आनंद देणारा आहे, तितकाच तो एक इशाराही आहे. कारण ज्या प्राण्याला ओळखण्यासाठी विज्ञानाला 100 वर्षं लागली, तो प्राणी नामशेष होण्याआधी त्याचं संरक्षण करणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे!