
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक अर्थात ‘Drugs Inspector’ पदाच्या भरती प्रक्रियेवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी तीन उमेदवारांच्या निकालांची आकडेवारी समोर ठेवत या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. मेहबूब शेख यांच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, डिसेंबर 2025 मध्ये FDA Chemical Analyst आणि DMER Pharmacist Group C या परीक्षा झाल्या होत्या. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनी, मार्च 2026 मध्ये Drugs Inspector पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षांच्या निकालांची तुलना करताना काही उमेदवारांच्या रँकमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याचा दावा शेख यांनी केला आहे.
त्यांनी दिलेल्या उदाहरणांनुसार, पायल लांडे यांची FDA Chemical Analyst परीक्षेतील रँक 10,210 होती, तर Drugs Inspector परीक्षेत त्यांना 31वा क्रमांक मिळाला. ऋतुजा अमृत पाटील यांना DMER Pharmacist Group C परीक्षेत 94 गुणांसह 21,222वी रँक मिळाली होती. मात्र Drugs Inspector परीक्षेत 155 गुणांसह त्यांनी 7वा क्रमांक मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. तर सागर रामलिंग थिटे यांना DMER Pharmacist Group C परीक्षेत 94 गुणांसह 21,160वी रँक मिळाली होती. Drugs Inspector परीक्षेत 150 गुणांसह त्यांना 14वा क्रमांक मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या निकालांमधील तफावत संशय निर्माण करणारी असल्याचे म्हणत शेख यांनी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट, सर्व्हर लॉग्स आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करून चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, संबंधित उमेदवारांचे सत्ताधारी पक्षातील नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, केवळ फोटो किंवा ओळखीच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येणार नाही, असे शेख यांनी स्पष्ट केले आहे. आता या आरोपांवर MPSC आणि राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

