राज्यात पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या राज्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये केवळ २४.७४ टक्के जलसाठा शिल्लक असून, हा साठा पुढील ८५ दिवसांपुरताच पुरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने शेतीसाठी पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध पाण्याचा वापर प्रामुख्याने पिण्याच्या गरजांसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विभागनिहाय पाहता, अमरावती विभागात ३८.०३ टक्के, नागपूरमध्ये ३६.५३ टक्के, कोकणात ३०.७० टक्के, संभाजीनगरमध्ये २७.८३ टक्के, नाशिकमध्ये २५.२० टक्के, तर पुणे विभागात केवळ १४.५७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात सुमारे ५ टक्क्यांची घट झाली आहे. राज्यातील २० जिल्ह्यांमधील साडेतीन हजारांहून अधिक गावे आणि वाड्या सध्या जवळपास एक हजार पाणी टँकरवर अवलंबून आहेत. पाऊस आणखी लांबल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी आणि पुणे यांसह अनेक शहरांमध्ये पाणी कपातीला सुरुवात झाली असून, नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.