आत्तापर्यंत हवा प्रदूषण म्हटलं की देशाची राजधानी दिल्लीचं नाव सर्वात आधी घेतलं जायचं. मात्र आता महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्याची हवा देखील चिंतेचा विषय ठरू लागली आहे. अलीकडच्या AQI (Air Quality Index) आकडेवारीनंतर यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या नोंदीनुसार मुंबईचा AQI 127, पुण्याचा 178, तर दिल्लीचा 110 इतका असल्याचं दिसतं. त्यामुळे मुंबई-पुण्याची हवा खरंच दिल्लीलाही मागे टाकतेय का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

AQI (Air Quality Index) हवेची गुणवत्ता मोजण्याचा निर्देशांक. हा आकडा जितका कमी, तितकी हवा अधिक स्वच्छ मानली जाते. 1 ते 50 दरम्यान AQI चांगला समजला जातो, तर 101 ते 200 दरम्यानची पातळी संवेदनशील व्यक्तींसाठी आरोग्याचा धोका निर्माण करू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामागे अनेक कारणं आहेत. हवामानातील बदलामुळे वाऱ्याचा वेग कमी होतो आणि त्यामुळे प्रदूषित हवा शहरातच अडकून राहते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सुरू असलेलं बांधकाम, रस्त्यांवरील धूळ, वाढती खासगी वाहनं आणि वाहतूक कोंडी यामुळेही प्रदूषण वाढतं.

मुंबईत विविध इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आणि नवी मुंबई विमानतळाचं काम सुरू आहे. तर पुण्यात मेट्रोचं काम, वाढती वाहनसंख्या आणि धुळीचा प्रश्न कायम आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत असून दमा, घसा खवखवणे, डोळ्यांत जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, धूळ नियंत्रणात ठेवणं आणि प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आता अधिक गरजेचं बनलं आहे. कारण हवा दिसत नसली तरी तिचा परिणाम प्रत्येक श्वासासोबत जाणवत असतो.