
भारताने रेल्वे मालवाहतूक क्षेत्रात एक ऐतिहासिक विक्रम नोंदवत जगासमोर आपले तांत्रिक सामर्थ्य सिद्ध केले आहे. ओव्हरहेड विद्युत तारेखाली (OHE) इलेक्ट्रिक इंजिनांच्या सहाय्याने डबल-स्टॅक कंटेनर रेल्वे चालवणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. या यशामुळे अमेरिका आणि चीनसारख्या प्रगत देशांनाही भारताने मागे टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) यांच्या पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गावर साकारण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील दादरी ते मुंबईजवळील जवाहरलाल नेहरू बंदर (JNPT) या मार्गावर ही अत्याधुनिक मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे.
डबल-स्टॅक कंटेनर रेल्वेची उंची लक्षात घेऊन भारतीय अभियंत्यांनी विशेष ‘हाय-राईज ओव्हरहेड इक्विपमेंट’ प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीत विद्युत संपर्क तारा सुमारे 7.45 मीटर उंचीवर बसवण्यात आल्या आहेत. तसेच उच्च क्षमतेची विशेष इलेक्ट्रिक इंजिने आणि अत्याधुनिक हाय-रीच पॅन्टोग्राफ विकसित करण्यात आले आहेत, ज्यामुळे रेल्वेला अखंडित वीजपुरवठा मिळतो. या तंत्रज्ञानामुळे एका फेरीत जवळपास दुप्पट कंटेनर वाहतूक शक्य होत आहे. परिणामी लॉजिस्टिक खर्च कमी होणार असून मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढणार आहे. याशिवाय डिझेलऐवजी वीजेचा वापर होत असल्याने कार्बन उत्सर्जनातही मोठी घट होणार आहे, ज्यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळणार आहे.
रेल्वे तज्ज्ञांच्या मते, जड मालवाहतूक, डबल-स्टॅक कंटेनर तंत्रज्ञान आणि पूर्ण विद्युतीकरण यांचा यशस्वी संगम साधणारी ही जगातील पहिलीच व्यवस्था आहे. ‘पीएम गतिशक्ती’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांना बळ देणारे हे पाऊल भारताला जागतिक उत्पादन आणि लॉजिस्टिक हब बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे मानले जात आहे.