
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ नुसार आता विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार आहे. हा नवा नियम १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे.
या नव्या धोरणानुसार, विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तीन भाषांपैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकायची असल्यास ती तिसरी भाषा म्हणून तेव्हाच निवडता येईल, जेव्हा उर्वरित दोन भाषा भारतीय असतील. अन्यथा, परदेशी भाषा अतिरिक्त चौथी भाषा म्हणून शिकावी लागेल.
सीबीएसईने यासंदर्भात १५ मे २०२६ रोजी सर्व शाळांना अधिकृत परिपत्रक पाठवून सूचना दिल्या आहेत. यापूर्वी सहावीच्या वर्गासाठीही त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आले होते आणि आता त्याचा विस्तार नववी-दहावीपर्यंत करण्यात आला आहे.
सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, भाषा शिक्षण हे नवीन एनसीईआरटी अभ्यासक्रमानुसारच होणार आहे. जोपर्यंत नववीसाठी नव्या पुस्तकांची उपलब्धता होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी सहावीच्या २०२६-२७ च्या आवृत्तीतील संबंधित भाषेची पुस्तके वापरू शकतील. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय भाषांबद्दल अधिक जागरूकता निर्माण होईल, तसेच मातृभाषा आणि इतर भारतीय भाषांचे ज्ञान वाढण्यास मदत होईल, असा सीबीएसईचा विश्वास आहे.

