युद्धात शत्रूच्या सैनिकांपेक्षा त्याचे डोळे आधी नष्ट केले, तर अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते आणि आता भारताने अशाच एका अत्याधुनिक क्षमतेची यशस्वी चाचणी करून संरक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. डीआरडीओ आणि भारतीय वायुदलाने नुकतीच स्वदेशी ‘रुद्रम-II’ मिसाइलची यशस्वी चाचणी पूर्ण केली. ओडिशाच्या किनारपट्टीजवळ झालेल्या या चाचणीत सुखोई-30 MKI फायटर जेटमधून मिसाइल डागण्यात आलं आणि त्याने ठरवलेलं लक्ष्य अचूकपणे भेदलं.\

रुद्रम-II हे हवेतून जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करणारे अत्याधुनिक मिसाइल आहे. विशेष म्हणजे याचे एक वर्जन शत्रूच्या रडारमधून आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नलमधून येणारे संकेत पकडून थेट त्याच रडारवर हल्ला करू शकते. म्हणजेच शत्रूची एअर डिफेन्स सिस्टिम आणि रडार नेटवर्क उद्ध्वस्त करून त्याला अक्षरशः आंधळं करण्याची क्षमता या मिसाइलमध्ये आहे. या मिसाइलची रेंज जवळपास 300 किलोमीटर असून ते तब्बल 5.5 मॅक वेगाने उड्डाण करते. म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा अनेक पटीने जास्त वेग. याशिवाय हे मिसाइल सुमारे 200 किलो स्फोटक पेलोड वाहून नेऊ शकते.
या चाचणीदरम्यान रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टिम आणि समुद्रातील जहाजांच्या मदतीने मिसाइलच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात आलं. सर्व आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर लक्ष्यभेद पूर्णपणे यशस्वी झाल्याचं स्पष्ट झालं. रुद्रम-II हा रुद्रम मिसाइल कुटुंबाचा भाग आहे. यानंतर रुद्रम-III वरही काम सुरू असून त्याची मारक क्षमता 600 किलोमीटरपेक्षा अधिक असू शकते. स्वदेशी तंत्रज्ञान, प्रचंड वेग आणि शत्रूची सुरक्षा व्यवस्था भेदण्याची क्षमता असलेल्या रुद्रम-II मुळे भारताच्या संरक्षण शक्तीत आणखी एक धारदार अस्त्र सामील झालं आहे.