
उत्तर प्रदेशातील भारत-नेपाळ सीमेवर एका अमेरिकी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती स्वतःला माजी US Navy अधिकारी असल्याचं सांगत आहे. मात्र, त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रं नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतलं. महाराजगंज जिल्ह्यातील सशस्त्र सीमा बल (SSB) रविवारी नियमित गस्त घालत होते. त्यावेळी सीमेजवळील पिलर क्रमांक ५१६ जवळ ३६ वर्षीय जॉर्डन ब्राऊन हा भारतातून नेपाळमध्ये जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. जवानांनी त्याला थांबण्यास सांगितलं. पण तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. अखेर जवानांनी त्याला पकडलं. चौकशीदरम्यान ब्राऊनने आपण अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून माजी US Navy अधिकारी असल्याचा दावा केला. त्याने थायलंडमधून टुरिस्ट व्हिसावर भारतात आल्याचंही सांगितलं. तिथे आपला पासपोर्ट हरवल्याचा दावा त्याने केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ब्राऊन २ नोव्हेंबर २०२५ रोजी समुद्रमार्गे भारतात आला होता. त्यानंतर तो काही काळ गोव्यात राहिला. नंतर गोव्यातून बंगळुरू आणि तिथून सोनौली सीमेमार्गे नेपाळमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या झडतीत ३१ हजार २६० रुपये रोख आणि दोन मोबाईल फोन सापडले. मात्र, त्याच्याकडे पासपोर्ट किंवा ओळख पटवणारा कोणताही वैध पुरावा नव्हता. SSB आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. त्याच्याविरोधात इमिग्रेशन आणि फॉरेनर्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो करत असलेल्या सर्व दाव्यांची सध्या पडताळणी सुरू असून, या प्रकरणामागे नेमकं काय आहे, याचा तपासही सुरू आहे.

