भारतातील ‘लाडकी बहीण’ योजनेची चर्चा होत अमेरिकेपर्य़ंत होते आहे. जागतीक महासत्ता असेल्या अमेरिकेलाही आता लाडकी बहिण योजनेची भुरळ पजली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांसाठी मोठी आर्थिक घोषणा केली आहे. आगामी मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे काँग्रेसवरील नियंत्रण कायम राहिल्यास प्रत्येक सज्ञान अमेरिकन नागरिकाला ५ हजार डॉलर देण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम साधारण ४.८ लाख रुपये आहे.

काय आहे ‘ट्रम्प डिव्हिडंड’?
ट्रम्प यांनी या प्रस्तावाला ‘ट्रम्प डिव्हिडंड’ असे नाव दिले आहे. कंपन्या आपल्या भागधारकांना नफा वाटून देतात, त्याच धर्तीवर नागरिकांना ही रक्कम देण्याची कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हा पैसा अमेरिकेतच खर्च करण्याची अट असू शकते, जेणेकरून देशांतर्गत अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
या योजनेचा लाभ सुमारे २४ ते २७ कोटी अमेरिकन नागरिकांना होऊ शकतो, असा अंदाज आहे. मात्र, यासाठी तब्बल १.२ ते १.३ ट्रिलियन डॉलर खर्च अपेक्षित असून या प्रस्तावाला काँग्रेसची मंजुरी आवश्यक आहे. हा निधी नेमका कुठून उभारला जाणार, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. टॅरिफमधून मिळणारे उत्पन्न किंवा आर्थिक विकासातून निधी उभारण्याच्या शक्यता व्यक्त होत आहेत.

योजनेच्या व्यवहार्यतेवर प्रश्न
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिकेत या प्रस्तावाच्या आर्थिक आणि कायदेशीर व्यवहार्यतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विरोधकांनी याला केवळ आश्वासन असल्याची टीका केली आहे. तसेच निवडणुकीपूर्वी नागरिकांना थेट आर्थिक लाभ देण्याच्या घोषणेचा राजकीय परिणाम काय होईल, यावरही चर्चा सुरू आहे.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका कधी?
अमेरिकेतील पुढील Midterm Elections ३ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहेत. या निवडणुकीत प्रतिनिधीगृहाच्या सर्व ४३५ जागांसाठी, तर सिनेटच्या ३५ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ट्रम्प यांच्या पुढील राजकीय अजेंड्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, ‘ट्रम्प डिव्हिडंड’ प्रत्यक्षात कधी आणि कोणत्या स्वरूपात लागू होणार, हे काँग्रेसच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होणार आहे.


