
खेळाडूंसाठी असलेल्या आरक्षणाचा फायदा घेऊन पुणे पोलीस दलात नोकरी मिळवण्यासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुराश आणि ड्रॅगनबोट या क्रीडा प्रकारांची बनावट प्रमाणपत्रे सादर करून तब्बल 19 उमेदवारांनी पोलीस दलात प्रवेश मिळवल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना पुणे गुन्हे शाखेने महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमका प्रकार काय?
पुणे पोलीस दलाच्या 2024 ते 2026 या भरती प्रक्रियेदरम्यान 19 उमेदवारांनी कुराश आणि ड्रॅगनबोट या खेळांशी संबंधित प्रमाणपत्रे सादर केली होती. खेळाडू आरक्षणाचा लाभ घेत या उमेदवारांची पोलीस दलात निवड झाली. मात्र, या प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी आणि चौकशी सुरू करण्यात आली. या तपासात प्रमाणपत्रे बनावट असल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या बनावट प्रमाणपत्रांसाठी उमेदवारांकडून प्रत्येकी तीन ते पाच लाख रुपये घेतल्याचा संशय आहे.
एका चुकीमुळे उघड झाला घोटाळा
या प्रकरणाच्या तपासात प्रमाणपत्रांवरील जिल्ह्यांच्या नावांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काही प्रमाणपत्रांवर धाराशिवऐवजी ‘उस्मानाबाद’ आणि छत्रपती संभाजीनगरऐवजी ‘औरंगाबाद’ अशी जुनी नावे वापरण्यात आली होती. ही जिल्ह्यांची नावे 2023 मध्ये बदलण्यात आली आहेत. त्यामुळे अलीकडे जारी झालेल्या प्रमाणपत्रांवर जुन्या जिल्ह्यांची नावे आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. तपासाचा विस्तार केल्यानंतर पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जळगाव, ठाणे, सातारा, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड आणि गोंदिया येथील संबंधित क्रीडा संघटनांकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांचीही चौकशी करण्यात आली.
स्पर्धाच झाली नसल्याचा संशय
पोलिसांच्या तपासानुसार, ज्या स्पर्धांमध्ये या उमेदवारांनी सहभाग घेतल्याचे कागदपत्रांमध्ये दाखवण्यात आले, त्या स्पर्धा प्रत्यक्षात झाल्याच नसल्याचा संशय आहे. तरीही संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून उमेदवारांच्या सहभागाची कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामुळे केवळ बनावट प्रमाणपत्रांचा मुद्दा नसून भरती प्रक्रियेत संगनमताने फसवणूक करण्यात आली का, याचाही तपास केला जात आहे.
19 पैकी 9 उमेदवार प्रशिक्षणाला
या प्रकरणातील सर्व 19 उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यापैकी 9 जण पोलीस प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत. आता या उमेदवारांवर विभागीय आणि कायदेशीर पातळीवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आरोपींमध्ये महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील संघटकांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
क्रीडा विभागाचीही चौकशी होणार
या प्रकरणाची व्याप्ती केवळ पोलीस भरतीपुरती मर्यादित आहे का, याचाही तपास सुरू आहे. 2020 नंतरच्या शासकीय नियमांनुसार राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये शासनाचा प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, संबंधित संघटनेने क्रीडा संचालनालयाला माहिती न देता स्पर्धा आयोजित केल्याचा आरोप आहे. त्यामुळे क्रीडा विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची भूमिका होती का, याचीही चौकशी केली जाणार आहे. पुणे पोलीस दलातील या प्रकरणानंतर अशाच पद्धतीने बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर करून इतर सरकारी विभागांमध्येही भरती झाली आहे का, याचा तपास होण्याची शक्यता आहे.

