
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, जरांगे यांच्या समर्थनासाठी अंतरवाली सराटीत आलेल्या एका मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दशरथ रायकर असे मृत आंदोलकाचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील संगम येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
अंतरवाली सराटीत आंदोलकाचा मृत्यू
दशरथ रायकर हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आले होते. रात्री उशिरा ते परिसरातील एका शेतात झोपले होते. मात्र, सकाळी ते झोपेतून उठले नाहीत. यानंतर त्यांना तातडीने अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जरांगे यांच्या उपोषणाचा सहावा दिवस
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मराठा समाजाकडून या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. नोंदी उपलब्ध असलेल्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र देणे, प्रमाणपत्राची वैधता देणे आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे यांसह विविध मागण्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत.
धाराशिवमध्ये आज जिल्हा बंदची हाक
जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज धाराशिव जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून आज जिल्हाभर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला व्यापारी संघटनांनीही पाठिंबा दिल्याची माहिती आहे. सरकारने लवकर निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. नागरिकांनी स्वेच्छेने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
परभणीतही जिल्हा बंद
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद शांततेच्या मार्गाने पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून, यापूर्वी विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते.
हिंगोलीतील बाजारपेठांनाही प्रतिसाद
हिंगोली जिल्ह्यातही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या या आवाहनाला विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सेनगाव, गोरेगाव, जवळा बाजार आणि आखाडा बाळापूर येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांनी दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे सकाळपासून काही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यातील विविध जिल्ह्यांतून मिळणारा पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे.

