
भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन आणि वीरचक्र विजेते अभिनंदन वर्धमान यांनी लष्करी सेवेनंतर आता नागरी विमान वाहतूक क्षेत्रात नवी कारकीर्द सुरू केली आहे. 2019 मध्ये पाकिस्तानच्या F-16 फायटर जेटला लक्ष्य केल्यानंतर देशभर चर्चेत आलेले अभिनंदन आता FLY91 या प्रादेशिक एअरलाइनमध्ये पायलट म्हणून कार्यरत झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अभिनंदन यांनी 31 मार्च 2026 रोजी भारतीय हवाई दलातून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी FLY91 मध्ये प्रवेश केला. लढाऊ विमान उडवणाऱ्या या वैमानिकाची पुढची जबाबदारी आता प्रवासी विमानातून देशातील विविध शहरांना जोडण्याची असेल.
2019 मध्ये संपूर्ण देशाचं लक्ष अभिनंदन यांच्याकडे
अभिनंदन यांची ओळख प्रामुख्याने 27 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान हवाई संघर्षामुळे झाली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीजवळ हालचाल केली. त्यावेळी अभिनंदन हे श्रीनगर एअरफोर्स स्टेशनवरील MiG-21 Bison स्क्वॉड्रनमध्ये तैनात होते. पाकिस्तानी विमानांना रोखण्यासाठी त्यांना मोहिमेवर पाठवण्यात आलं. हवाई संघर्षादरम्यान त्यांनी एका पाकिस्तानी F-16 चा पाठलाग करत त्याला पाडल्याचं अधिकृत प्रशस्तिपत्रात नमूद करण्यात आलं आहे. मात्र, या कारवाईदरम्यान त्यांच्या MiG-21 विमानालाही क्षेपणास्त्राचा फटका बसला. विमानाचं नुकसान झाल्यानंतर अभिनंदन यांनी इजेक्ट केलं आणि पॅराशूटच्या माध्यमातून पाकिस्तानच्या ताब्यातील भागात उतरले.
60 तास पाकिस्तानच्या ताब्यात
विमानातून बाहेर पडल्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलं. जवळपास 60 तास पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर 1 मार्च 2019 रोजी त्यांची भारतात सुटका झाली. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं. या संपूर्ण कारवाईतील शौर्यासाठी त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं.
हवाई दलात ग्रुप कॅप्टन पदापर्यंत मजल
अभिनंदन यांनी भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये जून 2004 मध्ये प्रवेश केला होता. आपल्या कारकिर्दीत त्यांनी MiG-21 Bison सोबतच Su-30MKI देखील उडवलं. डिसेंबर 2021 मध्ये त्यांची ग्रुप कॅप्टन पदावर पदोन्नती झाली. जवळपास दोन दशकांच्या लष्करी सेवेनंतर त्यांनी आता हवाई दलातून निवृत्ती स्वीकारली आहे.
आता FLY91 मध्ये ATR विमान उडवणार
हवाई दल सोडल्यानंतर अभिनंदन यांनी FLY91 या प्रादेशिक एअरलाइनमध्ये पायलट म्हणून काम सुरू केलं आहे. ही एअरलाइन मार्च 2024 पासून कार्यरत आहे. FLY91 च्या ताफ्यात सध्या ATR 72-600 प्रकारची सहा विमानं आहेत. गोवा आणि हैदराबाद ही एअरलाइनची प्रमुख ऑपरेशनल केंद्रं आहेत. गोवा, हैदराबाद, बंगळुरू, पुणे, कोची, अगट्टी आणि हुबळीसह टियर-2 आणि टियर-3 शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर कंपनी सेवा देते. अभिनंदन यांच्या नियुक्तीबाबत एअरलाइनने पुष्टी केली असली, तरी त्यांच्या वैयक्तिक रोजगाराशी संबंधित अधिक तपशील देण्यास नकार दिला आहे.

लढाऊ विमानानंतर आता प्रवासी विमानाचं कॉकपिट
अभिनंदन यांच्या कारकिर्दीतील हा बदल विशेष मानला जात आहे. एकीकडे MiG-21 Bison हे सुपरसॉनिक फायटर जेट, तर दुसरीकडे ATR 72-600 हे प्रादेशिक प्रवासी वाहतुकीसाठी वापरलं जाणारं टर्बोप्रॉप विमान आहे. यामुळे रणांगणातील हवाई मोहिमांपासून आता देशातील विविध शहरांदरम्यान प्रवासी उड्डाणं करण्यापर्यंत अभिनंदन यांचा प्रवास झाला आहे. सध्या ते आवश्यक प्रशिक्षण आणि नियामक प्रक्रिया पूर्ण करत असल्याची माहिती आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते FLY91 च्या नियमित प्रवासी सेवांमध्ये ATR विमान उडवताना दिसू शकतात.
FLY91 च्या विस्ताराचीही तयारी
दरम्यान, FLY91 आपल्या ताफ्याचा विस्तार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या सहा विमानांच्या तुलनेत भविष्यात ताफा 20 विमानांपर्यंत वाढवण्याची योजना असल्याचं सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत अभिनंदन वर्धमान यांचा लष्करी वैमानिक म्हणूनचा अनुभव आता देशांतर्गत नागरी विमान वाहतूक क्षेत्रात उपयोगी ठरणार आहे. 2019 मध्ये MiG-21 घेऊन हवाई युद्धात उतरलेले अभिनंदन आता ATR विमानातून प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीतील हा बदल सध्या विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

