मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुन्हा तीव्र करण्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. शनिवार (दि. २९) पासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे ते निर्णायक उपोषणाला सुरुवात करणार आहेत. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील आंदोलन थेट मुंबईत नेण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. शुक्रवारी अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. “ज्यांना आंदोलनात यायचे आहे ते येतील. संकटावर मात करण्यासाठी मी पक्का आहे,” असे सांगत त्यांनी समाजाला पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

कुणबी प्रमाणपत्रासाठी पुन्हा अर्ज करण्याचे आवाहन
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे यांनी पुन्हा जोर दिला. ज्यांना अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन पुन्हा अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजाने आता मरगळ झटकून आपल्या हक्कांसाठी एकत्र यावे, असेही जरांगे म्हणाले. आंदोलन सध्या अंतरवाली सराटी येथे होणार असले तरी सरकारने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर पुढील लढा मुंबईत नेला जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
विखे पाटलांवर जरांगेंची टीका
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी फारसे अर्ज शिल्लक नसल्याचे वक्तव्य केल्याचा मुद्दाही जरांगे यांनी उपस्थित केला. विखे पाटील यांचा दावा चुकीचा असून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २२ लाख नोंदी सापडल्याचे म्हटले होते. मात्र त्यावर वेगळी भूमिका मांडली जात असल्याने मराठा उपसमितीच्या अध्यक्षांकडून अशी विसंगत माहिती अपेक्षित नसल्याचे जरांगे यांनी म्हटले. “समाजाला किती दिवस फसवणार?”*असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अंतरवाली सराटीत कडेकोट पोलिस बंदोबस्त
जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात सुमारे ३५० पोलिस कर्मचारी, एसआरपीएफच्या ६ तुकड्या, होमगार्ड तसेच ५५ पोलिस अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाल्याने अंतरवाली सराटीतील या उपोषणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुढील काळात काय चर्चा होते आणि उपोषणाची दिशा काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

