गौतमी पाटील म्हटलं की सोशल मीडियावर तिच्या डान्सची चर्चा आणि त्यावरून होणारी टीका हे चित्र अनेकदा पाहायला मिळतं. पण आता याच टीकेवर गौतमी पाटीलने थेट अभिनेत्री माधुरी दीक्षितसमोर आपली बाजू मांडली आहे. “तुम्हाला वाटतं की मी अजूनही त्याच चुका करतेय, तर एकदा माझ्या कार्यक्रमाला येऊन पाहा. चूक वाटली तर बोला,” असं स्पष्ट आवाहन गौतमीने केलं आहे. सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागात गौतमी पाटील आणि शिव ठाकरे सहभागी होणार असून, यावेळी गौतमीच्या जुन्या व्हायरल व्हिडिओचा विषय चर्चेत येणार आहे.

माधुरी दीक्षितसोबतच्या गप्पांमध्ये गौतमीने त्या व्हिडिओमुळे झालेल्या ट्रोलिंगचा अनुभव सांगितला. ती म्हणाली की, ज्या वेळी हा व्हिडिओ सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर चर्चेत होता, त्या वेळी ती स्वतः एका कार्यक्रमात होती. कार्यक्रम संपवून घरी जात असताना तिला या प्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर तिने तातडीने आपली बाजू मांडत, आपल्याकडून नकळत चूक झाल्याचं मान्य केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली.
गौतमीच्या म्हणण्यानुसार, त्या घटनेनंतर तिने स्वतःमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. मात्र, तिच्या जुन्या व्हिडिओंचीच वारंवार चर्चा होत असल्यामुळे लोकांपर्यंत तिच्या सध्याच्या कामाची माहिती पोहोचत नाही. त्यामुळे ती अजूनही पूर्वीसारखंच काम करते, असा गैरसमज निर्माण होतो. “आता मी जे चांगलं करतेय, ते दाखवलं जात नाही. जुने व्हिडिओ दाखवल्यामुळे लोकांना वाटतं की मी अजूनही तेच करतेय,” अशी खंतही तिने व्यक्त केली.

याच चर्चेदरम्यान गौतमीने आपल्या कार्यक्रमांना येणाऱ्या प्रेक्षकांबद्दलही सांगितलं. पूर्वी कार्यक्रमांमध्ये पुरुष प्रेक्षकांची संख्या जास्त असायची, मात्र आता महिला प्रेक्षकांची उपस्थितीही वाढली असल्याचं तिने नमूद केलं. टीकेच्या काळातही प्रेक्षकांनी आपल्याला साथ दिली आणि त्यामुळे कामाच्या संधी कायम राहिल्या, असंही ती म्हणाली. गौतमीची बाजू ऐकल्यानंतर माधुरी दीक्षितने तिचं म्हणणं समजून घेत प्रतिक्रिया दिली. “तुम्ही एकदा चूक मान्य केली आणि सुधारणा केली, तर मग काय बोलायचं? काही विषयच राहत नाही,” असं माधुरी म्हणाली. त्यामुळे ‘कोण होणार करोडपती’च्या या आगामी भागात गौतमीच्या वक्तव्याची आणि माधुरीच्या प्रतिक्रियेची चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

