
साईबाबांच्या शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरातील काही प्रसाद विक्री केंद्रांवर निकृष्ट दर्जाचे आणि संशयास्पद पेढे विकले जात असल्याचं एका पडताळणीत उघड झालं आहे. शिर्डीत दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. दर्शनानंतर अनेक जण प्रसाद म्हणून पेढे खरेदी करतात. मात्र याच पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पडताळणीदरम्यान अनेक पेढ्यांच्या पॅकेटवर उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट आणि उत्पादकाची माहिती नमूद नसल्याचं आढळून आलं. त्यामुळे हे पेढे नेमके कुठे तयार झाले, किती दिवसांपूर्वी बनवण्यात आले आणि ते खाण्यास सुरक्षित आहेत की नाहीत, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती ग्राहकांना मिळत नाही.
याहूनही गंभीर बाब म्हणजे काही पॅकेटमधील पेढे अतिशय कडक झाल्याचं, तर काही ठिकाणी त्यांच्यावर बुरशी आढळल्याचं समोर आलं आहे. प्रसादाच्या नावाखाली अशा पेढ्यांची विक्री होत असल्याने भाविकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक आणि भाविकांच्या मते, हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असून संबंधित यंत्रणांकडून पुरेशी कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. शिर्डी नगरपालिका तसेच अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नियमित तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे साईभक्तांमध्ये संताप आणि नाराजीचे वातावरण असून श्रद्धेशी जोडलेल्या प्रसादाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

