
दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई, नवीन कपडे, फराळाचा सुगंध, नातेवाईकांना भेटवस्तू, घराची सजावट आणि फटाक्यांची आतषबाजी… या सगळ्याची लगबग सुरू होते. पण गेल्या काही वर्षांत या आनंदासोबतच एक गोष्ट वाढताना दिसतेय, ती म्हणजे दिवाळीचा खर्च. पूर्वी ठरावीक बजेटमध्ये सण साजरा करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना आता त्याच गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो, दिवाळी खरंच महाग होतेय का? की सण साजरा करण्याच्या आपल्या पद्धती बदलतायत?
फराळापासून मिठाईपर्यंत… खिशाला बसतोय फटका
दिवाळीच्या खर्चात सर्वांत आधी भर पडते ती फराळाच्या साहित्याची. चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे, चिवडा असे पदार्थ बनवण्यासाठी तेल, तूप, साखर, बेसन, रवा, मैदा, पोहे आणि खोबऱ्याची गरज पडते. पण यंदा आणि दरवर्षीच दिवाळीच्या तोंडावर या सगळ्या साहित्याच्या किमती वाढतात. त्यामुळे घरगुती फराळ बनवण्याचा खर्चसुद्धा वाढतो. आता यावर्षीच बघा, पुण्यातील बाजारभावानुसार, साखरेचा दर किलोमागे 42 रुपयांवरून 53 रुपये, बेसन 110 रुपयांवरून 140 रुपये, तर तूप 150 रुपयांवरून 190 रुपये झालं आहे. सूर्यफूल तेलाचे दरही 150 रुपयांवरून 180 ते 185 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे घरगुती फराळ बनवण्याचा खर्चही वाढतोय. तयार फराळाचे दरसुद्धा वाढले आहेत. पुणे मर्चंट्स चेंबरकडून विकल्या जाणाऱ्या लाडूचा दर गेल्या वर्षी 190 रुपये किलो होता, तो यंदा 230 रुपये झाला आहे. चिवड्याचा दरही 200 रुपयांवरून 230 रुपये झाला आहे. त्यात बदाम, पिस्ता यांसारखा सुका मेवा महागल्यामुळे मिठाई आणि गिफ्ट बॉक्ससाठीही जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
कपडे, सोनं आणि सजावटीचा खर्च
दिवाळीत घरातील प्रत्येकासाठी नवीन कपडे घ्यायचे, ही जणू एक परंपराच बनली आहे. त्यात ब्रँडेड कपडे, ऑनलाइन शॉपिंग आणि डिस्काउंटच्या जाहिरातींमुळे खरेदीची यादी वाढते. अनेकदा सेलमध्ये वस्तू स्वस्त मिळतायत असं वाटतं, पण प्रत्यक्ष बिल पाहिल्यावर बजेटचा अंदाज येतो. म्हणजे डिस्काउंट, सेल हे सगळं मोह-माया आहे.
धनत्रयोदशीला सोनं-चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे अनेक कुटुंबं खरेदी पुढे ढकलतात किंवा कमी वजनाचे दागिने घेतात. घराची सजावट, आकाशकंदील, पणत्या, लाईटिंग आणि रांगोळीच्या साहित्यावरही वेगळा खर्च होतो. दिवाळीच्या मुहूर्तावर टीव्ही, फ्रिज किंवा एसी घेण्याचा विचार असेल, तर काही कंपन्यांनी यंदा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत केलेली 3 ते 7 टक्क्यांची वाढ बजेटवर परिणाम करू शकते.
बोनस मिळतो, पण खर्चही वाढलेलाच असतो
याशिवाय मिठाई, भेटवस्तू, प्रवास, पाहुणचार आणि फटाक्यांवरही खर्च होतो. बोनस मिळाला की खरेदीचा उत्साह वाढतो. पण दिवाळीनंतर घरभाडं, वीजबिल, शाळेची फी आणि कर्जाचे हप्तेही भरायचे असतात. त्यामुळे सणासाठी केलेला जास्तीचा खर्च पुढच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम करू शकतो.
महागाई वाढतेय की खरेदीच्या सवयी बदलतायत?
दिवाळी महाग होण्यामागे केवळ वस्तूंच्या वाढलेल्या किमती जबाबदार नाहीत. सप्टेंबर 2026 मध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर 5.54 टक्के, तर अन्नधान्याशी संबंधित महागाईचा दर 7.74 टक्के नोंदवला गेला. रोजच्या वस्तू महागल्याचा परिणाम सणाच्या खरेदीवरही होतोय. त्याचवेळी पूर्वी गरजेपुरती असलेली खरेदी आता सजावट, इलेक्ट्रॉनिक्स, महागड्या भेटवस्तू आणि ऑनलाइन शॉपिंगपर्यंत पोहोचली आहे. सोशल मीडियावर इतरांचं दिवाळी सेलिब्रेशन पाहून आपल्याही घरात संच काहीतरी असावं, असा फोमो होतो. त्यामुळे बऱ्याचदा अनावश्यक खरेदी होते आणि बजेट कोलमडतं.
दिवाळीचा आनंद महत्त्वाचा की बजेट?
मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सण साजरा करणं आणि आर्थिक नियोजन सांभाळणं, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे खरेदीची यादी आधी तयार करणं आणि ठरवलेल्या बजेटमध्येच खरेदी करणं गरजेचं आहे. कारण दिवाळीचा खरा आनंद महागड्या वस्तूंमध्ये नसतो, कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेत, घरच्या फराळात आणि नातेवाईकांच्या भेटीत असतो. पण वाढत्या किमतींमुळे हा आनंद साजरा करतानाही मध्यमवर्गीयांना आता खिशाचा विचार करावा लागतोय. त्यामुळे प्रश्न दिवाळी साजरी करायची की नाही, हा नाही; तर आनंद आणि आर्थिक नियोजनाचा समतोल कसा साधायचा, हा आहे.

