देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानला जाणारा पद्म पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर जाताना त्यांना दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागल्याचे पाहून त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली. या क्षणाचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यांच्या प्रकृतीबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारण्यासाठी अलका याज्ञिक जेव्हा आपल्या जागेवरून उठल्या, तेव्हा त्या शारीरिकदृष्ट्या अशक्त असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. मंचावर जाताना त्यांना सहाय्यकाची मदत घ्यावी लागली. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, पद्मभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर अलका याज्ञिक यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत गेल्या दोन वर्षांतील त्यांच्या आरोग्याशी संबंधित संघर्षाबद्दल प्रथमच सविस्तर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून त्या सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रसिद्धीपासून दूर राहिल्या होत्या. या काळात त्या गंभीर आरोग्यविषयक समस्यांशी झुंज देत होत्या.
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, या कठीण काळात चाहत्यांचे प्रेम, प्रार्थना, संदेश आणि पाठिंबा त्यांच्यासाठी मोठा आधार ठरला. “गेल्या दोन वर्षांपासून मी सार्वजनिक आयुष्यापासून दूर होते. माझ्या आरोग्याशी संबंधित अनेक आव्हानांचा सामना करत होते. या प्रवासात मिळालेलं प्रेम आणि प्रार्थना मला पुढे जाण्याची ताकद देत राहिल्या,” असे त्यांनी म्हटले.
पद्मभूषण पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, हा सन्मान केवळ त्यांच्या नावावर नसून त्यांच्या गाण्यांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना अनेक वर्षे साथ देणाऱ्या लाखो श्रोत्यांचाही आहे. “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर प्रेम, आशा आणि धैर्याच्या शक्तीची आठवण आहे,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
यासोबतच त्यांनी आपल्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगत “मी हळूहळू कमबॅक करत आहे” असे भावनिक शब्दांत लिहिले. या क्षणी स्वतःसाठीच नव्हे, तर आपल्या संपूर्ण प्रवासात सोबत राहिलेल्या चाहत्यांसाठी उपस्थित राहणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अलका याज्ञिक या गेल्या काही काळापासून ‘सेंसरीन्यूरल हियरिंग लॉस’ या आजाराशी झुंज देत आहेत. व्हायरल इन्फेक्शनमुळे त्यांची ऐकण्याची क्षमता प्रभावित झाली असून त्यांनी याबाबत २०२४ मध्ये पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या माहिती दिली होती. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अद्याप पूर्णपणे बऱ्या झालेल्या नसल्याचे सांगितले होते. या आरोग्य समस्येमुळे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यावर आणि कामावरही परिणाम झाला आहे.
भारतीय संगीत क्षेत्रात अनेक दशकांपासून आपल्या आवाजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका याज्ञिक यांना मिळालेला पद्मभूषण सन्मान हा त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मात्र, या सन्मानासोबतच त्यांच्या संघर्षाची कहाणीही समोर आली असून त्यांच्या चाहत्यांकडून आता त्यांना लवकरात लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

