
अशोक खरात प्रकरणाने सगळ्यांचीच झोप उडवली होती आणि आता त्याच प्रकरणावर आधारित असल्याचा दावा करणारा एक सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’. सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच समोर आलाय आणि त्याने सोशल मीडियावर चर्चा वाढवली आहे. या सिनेमात अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दीपाली या भूमिकेला योग्य पद्धतीने न्याय देऊ शकतील अशी खात्री असल्यानेच त्यांची या भूमिकेसाठी निवड झाली आहे असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. शिवाय अभिनेते उदय टिकेकर सुद्धा या टिझर मध्ये दिसतायत पण मुख्य भूमिकेत कोण आहे हे अजून रिव्हील केलेलं नाहीये. सगळ्यात जास्त चर्चा मात्र सिनेमाच्या नावाची आणि विषयाची होतेय. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हे नाव ऐकताच अनेकांना मनात याच वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेल्या अमेरिकेतल्या जेफ्री एप्सटिन प्रकरणाची आठवण आली. शिवाय ‘आता सगळं उघड होणार’ या टॅगलाईनमागे नेमकं काय दडलंय? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जातायत.

निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार हा सिनेमा महाराष्ट्रातल्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या एका महत्त्वाच्या प्रकरणावर प्रकाश टाकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वरूप सावंत करत असून सध्या चित्रपटाचं शूटिंग जोरात सुरू आहे. २ ऑक्टोबर २०२६ ला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. फर्स्ट लूक समोर आल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती एकाच गोष्टीची… ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा फक्त एक काल्पनिक पोलिटिकल थ्रिलर असणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक धक्कादायक पण पडद्यामागे घडलेले किस्से यात दाखवले जाणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? शिवाय तुम्ही हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का?

