
रात्री उशिरा एखाद्याला मेसेज करायचा असतो, पण समोरच्याची झोप मोडू नये म्हणून आपण थांबतो… किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी शुभेच्छा द्यायच्या असतात, पण कामाच्या गडबडीत त्या विसरून जातो. आता अशा सगळ्या गोष्टींची चिंता मिटणार आहे. कारण व्हॉट्सॲप आता वापरकर्त्यांसाठी मेसेज शेड्यूल करण्याचं फीचर घेऊन आलं आहे. म्हणजे तुम्ही मेसेज आत्ताच लिहायचा, पण तो समोरच्याला नेमका कधी पाठवायचा हे आधीच ठरवता येणार आहे. या नव्या फीचरमुळे वापरकर्त्यांना १० मिनिटांपासून ते पुढील १४ दिवसांपर्यंत कोणत्याही वेळेसाठी मेसेज शेड्यूल करता येणार आहे. विशेष म्हणजे ही सुविधा फक्त एखाद्या व्यक्तीच्या खासगी चॅटमध्येच नाही, तर ग्रुप चॅटमध्येही वापरता येणार आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा, परीक्षेसाठी ऑल द बेस्ट, एखाद्या कार्यक्रमाची आठवण किंवा महत्त्वाचा रिमाइंडर पाठवण्यासाठी हे फीचर उपयोगी पडणार आहे.
समजा, तुमच्या मित्राचा वाढदिवस मध्यरात्री आहे, पण तुम्हाला १२ वाजता जागं राहायचं नाही. तर तुम्ही रात्रीच शुभेच्छांचा मेसेज लिहून बारा वाजतासाठी शेड्यूल करू शकता. किंवा सकाळी ऑफिसला जाताना एखाद्या ग्रुपला महत्त्वाची माहिती पाठवायची असेल, तर तीही आधीच सेट करून ठेवता येईल. मेसेज शेड्यूल करण्याची पद्धतही अगदी सोपी आहे. ज्या व्यक्तीला किंवा ग्रुपला मेसेज पाठवायचा आहे, त्याची चॅट उघडा. मेसेज टाइप करा आणि सेंड बटण दाबून धरून ठेवा. त्यानंतर तारीख आणि वेळ निवडण्याचा पर्याय दिसेल. तिथे तुम्हाला मेसेज पाठवायची वेळ सेट करता येईल. एकदा वेळ ठरवली की व्हॉट्सॲप ठरलेल्या वेळी मेसेज पाठवेल.
आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे फीचर केवळ टेक्स्ट मेसेजपुरतं मर्यादित नाही. फोटो आणि व्हिडिओदेखील शेड्यूल करता येणार आहेत. म्हणजे एखाद्या खास प्रसंगासाठी फोटोसह शुभेच्छा किंवा ग्रुपमध्ये एखादा व्हिडिओ नंतर पाठवायचा असेल, तर तेही आधीच सेट करून ठेवता येईल. आणि समजा, मेसेज शेड्यूल केल्यानंतर तुमचा प्लॅन बदलला, तर काळजी करण्याची गरज नाही. शेड्यूल केलेल्या मेसेजची यादी पाहता येणार असून, मेसेज पाठवण्याआधी तो रद्द किंवा डिलीटही करता येणार आहे. त्यामुळे चुकीचा मेसेज किंवा बदललेला रिमाइंडर वेळेआधी हटवण्याची सुविधा मिळेल.
व्हॉट्सॲपच्या माहितीनुसार, फोन बंद असला किंवा बॅटरी संपली तरी शेड्यूल केलेला मेसेज ठरलेल्या वेळी पाठवला जाईल. तसेच या मेसेजवरही नेहमीप्रमाणे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असेल. म्हणजे मेसेजचा मजकूर सुरक्षित राहणार असून व्हॉट्सॲपलाही तो वाचता येणार नाही. हे फीचर येत्या काही आठवड्यांत जगभरातील वापरकर्त्यांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवताना आता वेळेचं बंधन कमी होणार असून, मेसेज कधी पाठवायचा हे ठरवण्याची सोय थेट आपल्या हातात येणार आहे.

