
आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानममध्ये (TTD) एका भक्ताने तब्बल 121 किलो सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. या सोन्याची किंमत सुमारे
150 ते 160 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मंदिराच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक देणगी असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे हे दागिने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत मंदिर प्रशासनाकडे औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आले.
ही देणगी चेन्नईतील एका NRI व्यावसायिकाने दिली असल्याचं सांगीतलं जात आहे. कंपनीच्या विक्रीनंतर मिळालेल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने भगवान व्यंकटेश्वर स्वामींना ही देणगी दिली आहे. मात्र, संबंधित भक्ताने आपली ओळख सार्वजनिक करू नये, अशी विनंती मंदिर प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर या दानशूर व्यक्तीची ओळख समोर आली आहे.
एका वृत्तानुसार, ॲक्सेस हेल्थकेअर आणि आशिया चेन्नई इंजिनिअरिंगचे संस्थापक वर्धमान जैन यांनी हे 121 किलो सोन्याचे दागिने दान केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये त्यांनी ॲक्सेस हेल्थकेअरमधील 70 टक्के हिस्सा अमेरिकेतील एका कंपनीला विकला होता. हा व्यवहार सुमारे 2 अब्ज डॉलर्सचा असल्याचे सांगितले जाते. याच यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी तिरुपती मंदिरात ही मोठी देणगी दिल्याचे वृत्त आहे.
TTD प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष दागिने तयार करण्यात आले. तब्बल 15 महिन्यांच्या मेहनतीनंतर 45 दागिने तयार करण्यात आले असून त्यांची नऊ संचांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये मुकुट, सुवर्ण पादुका, शंखचक्र, कमरपट्टा आणि अभय हस्त यांसारख्या अलंकारांचा समावेश आहे. 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत हे दागिने मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.
चंद्राबाबू नायडू सकाळी तिरुपती येथील एसव्ही ॲग्रिकल्चरल कॉलेज हेलिपॅडवर पोहोचले. त्यानंतर तिरुमला येथील गायत्री निलयम येथे गेले आणि वैकुंठम क्यू कॉम्प्लेक्समधून श्रीवारी दर्शन घेतले. त्यानंतर सकाळी 11.35 वाजता 121 किलो सोन्याची देणगी औपचारिकरित्या TTD प्रशासनाकडे सोपवण्यात आली.
वर्धमान जैन यांची तिरुपतीला देणगी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे 2026 मध्ये त्यांनी TTDला इलेक्ट्रिक बसेस दान केल्या होत्या. याशिवाय श्री वेंकटेश्वर भक्ती चॅनेलच्या विकासासाठी 7 कोटी रुपयांची देणगी आणि सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे कॉइन-सॉर्टिंग मशीनही त्यांनी दिले आहे.
वर्धमान जैन सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांनी आविष्कार नावाची संस्था सुरू केली असून, वंचित तरुणांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर तिचा भर आहे. ते ‘कांची कामकोटी चाइल्ड्स ट्रस्ट हॉस्पिटल’चे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. तसेच सरिता जैन फाउंडेशनच्या माध्यमातून विद्या सेवा आणि वैद्य सेवा या उपक्रमांतर्गत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला मदत केली जाते.
दरम्यान, तिरुमला तिरुपती देवस्थानम हे जगातील सर्वात श्रीमंत धार्मिक संस्थांपैकी एक मानले जाते. देवस्थानकडे मोठ्या प्रमाणावर सोने, बँक ठेवी आणि देशभरातील स्थावर मालमत्ता आहे. गोल्ड मॉनेटायझेशन स्कीमअंतर्गत विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 11,329 किलोहून अधिक शुद्ध सोने जमा असल्याचे सांगितले जाते. याशिवाय मंदिराच्या खजिन्यात नित्यपूजा आणि उत्सवांसाठी वापरले जाणारे सुमारे 2.5 टन सुवर्ण अलंकारही आहेत. अशा परिस्थितीत 121 किलो सोन्याची ही देणगी तिरुपतीच्या इतिहासातील विशेष ठरली आहे.

