
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक आणि ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोकुळच्या म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात तब्बल 6 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता पूर्वीपेक्षा तीन रुपये अधिक मिळणार आहेत. गाईच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरातही प्रत्येकी 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
गोकुळच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पार पडली. याच बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. संघाची सुमारे 70 कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. गोकुळच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी दूध दरवाढ असल्याचं समोर आलं आहे.
शनिवारपासून नवे दर लागू होणार
मिळालेल्या माहितीनुसार, वाढीव दूध दर शनिवारपासून लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात दुधाची उपलब्धता आणि परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा दरवाढ केली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात ग्राहकांच्या दूध खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या खरेदी दरवाढीची मागणी
दुष्काळी परिस्थितीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या दुधासाठी अधिक दर मिळावा, अशी मागणी समविचारी आघाडीकडून सातत्याने करण्यात येत होती. देशातील अनेक दूध संस्थांनी विक्री दरात वाढ केल्यानंतर गोकुळकडूनही दरवाढीचा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. विक्री दर वाढवण्यास विरोध नसला, तरी ग्राहकांकडून वाढीव दर घेण्यापूर्वी दूध उत्पादकांच्या खरेदी दरात वाढ करावी, अशी भूमिका समविचारी आघाडीने घेतली होती. आता गोकुळने म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात 3 रुपये आणि गाईच्या दुधाच्या खरेदी दरात 2 रुपये वाढ केली आहे.

