
मुंबईतील दादर स्थानकाच्या नामांतरावरून सुरू असलेल्या चर्चेला आता नवं वळण मिळालं आहे. दादर रेल्वे स्थानकाचं नामांतर होणार नसून दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मेट्रो स्थानकाच्या नामकरणासाठी विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्याची चर्चा समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मनसे आणि शिवसेनेसह काही विरोधकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. महायुतीमधूनही रेल्वे स्थानकाच्या नामांतराबाबत मतभेदाचे सूर उमटले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता दादर मेट्रो स्थानकाच्या नामकरणाची भूमिका स्पष्ट केली आहे.
दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, यासंदर्भात केंद्र सरकारलाही पत्र पाठवण्यात आलं आहे. मात्र, नामकरणाच्या पुढील प्रक्रियेसाठी विधिमंडळातील समितीबाबत केंद्राकडून मार्गदर्शन मिळालं आहे. त्यामुळे आगामी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दादर मेट्रो स्थानकाचं ‘चैत्यभूमी’ असं नामकरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथे करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका आणि विविध बौद्ध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत मोठ्या संख्येने अनुयायी दाखल होत असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली. स्मारकाचं बहुतांश काम पूर्ण झालं असून मुख्य पुतळ्याच्या कामासंदर्भात काही बाबी अद्याप प्रलंबित आहेत. कामाचा खर्च वाढला तरी उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. स्मारकाचं उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन प्रलंबित विषय मार्गी लावण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांना आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुंबई महापालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून दरवर्षी व्यवस्थेत सुधारणा करण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं. समन्वय समिती आणि विविध संघटनांकडून येणाऱ्या सूचनांचा विचार करून त्यानुसार उपाययोजना केल्या जातील, असंही शिंदे यांनी सांगितलं. मुंबईत प्रवेश करताना महामार्गावरील टोल यापूर्वीच बंद करण्यात आला आहे. तसेच महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोल सवलत देण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

