भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर असलेल्या युझवेंद्र चहलने मैदानावर अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा त्याची चर्चा सुरू झाली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये 400 विकेट्स घेण्याचा मोठा टप्पा पार करणारा चहल हा पहिलाच भारतीय बॉलर ठरला आहे. विशेष म्हणजे, भारतीय टीमकडून खेळण्याची संधी मिळत नसतानाही चहलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला फॉर्म कायम ठेवला आहे. सध्या तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणा टीमकडून खेळत आहे.

हरियाणा आणि तमिळनाडू यांच्यात झालेल्या सामन्यात चहलने आपल्या फिरकीचा चांगलीच कमाल दाखवली. त्याने चार ओव्हर्समध्ये फक्त 16 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. त्याच्या या शानदार बॉलिंगमुळे तमिळनाडूच्या बॅट्समनना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या तीन विकेट्ससह चहलच्या टी-२० कारकिर्दीतील एकूण विकेट्सची संख्या 402 झाली आहे. त्यामुळे हा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय बॉलर्सच्या यादीत चहल आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या मागे भुवनेश्वर कुमार असून त्याने आतापर्यंत 366 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह 354 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पीयूष चावला आणि आर. अश्विन यांनी अनुक्रमे 329 आणि 323 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत अक्षर पटेल 300 विकेट्ससह सहाव्या, तर अर्शदीप सिंग 294 विकेट्ससह सातव्या क्रमांकावर आहे.

विशेष म्हणजे, 2023 मध्ये झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर चहलला भारतीय टी-२० टीममध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, याचा त्याच्या खेळावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. आयपीएल असो किंवा देशांतर्गत क्रिकेट, चहल सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. इतकंच नाही तर काऊंटी क्रिकेटमध्येही त्याने लाल चेंडूने खेळताना आपली छाप पाडली होती. त्यामुळे भारतीय टीममध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाल्यास तो पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. चहलच्या या नव्या विक्रमामुळे टी-२० क्रिकेटमधील त्याचं स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

