भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू हरमनप्रीत कौर हिने भारतीय संघाच्या तिन्ही प्रकारांमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. 6 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत तिने या निर्णयाची घोषणा केली. कर्णधार म्हणून घेतलेले कठीण निर्णय, पराभव, टीका, विजय आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान या सगळ्या आठवणींना उजाळा देताना हरमनप्रीतने आपण या संघासाठी आपलं सर्वस्व दिल्याचं म्हटलं. मात्र, कर्णधारपद सोडल्यानंतरही संघ चांगल्या स्थितीत असल्याचं समाधान तिला असल्याचं तिने सांगितलं.

हरमनप्रीत कौरचा हा प्रवास मात्र एका मोठ्या क्रिकेट मैदानापासून सुरू झालेला नाही. पंजाबमधील मोगाच्या मैदानावर मुलांसोबत क्रिकेट खेळणारी एक मुलगी म्हणून तिची सुरुवात झाली. प्रशिक्षक कमलदीश सिंग सोधी यांनी तिला पहिल्यांदा खेळताना पाहिलं आणि तिच्यातील प्रतिभा ओळखली. त्यांनी हरमनच्या वडिलांना तिच्या प्रशिक्षणाचा खर्च आणि शाळेत ये-जा करण्याची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली. 2007 पासून कमलदीश सिंग यांनी हरमनला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि पुढे याच मार्गाने ती राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर आणि अखेर भारतीय संघापर्यंत पोहोचली.

हरमनला सुरुवातीपासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. प्रशिक्षक तिला मुलांसोबत खेळवायचे, कारण आपल्यापेक्षा ताकदवान खेळाडूंसोबत खेळल्याने खेळात सुधारणा होते, असा त्यांचा विश्वास होता. सुरुवातीला हरमन वेगवान गोलंदाजी करायची, नंतर तिचा भर फलंदाजीवर वाढला. भारतीय संघात आल्यानंतर तिने फिरकी गोलंदाजीचाही सराव केला. तिच्या आक्रमक फलंदाजीची झलक सुरुवातीपासूनच दिसत होती. पटियालामधील एका सामन्यात तिच्या फटक्याने जवळच्या घराची काच फुटल्याची आठवणही तिचे प्रशिक्षक सांगतात. हरमनप्रीतचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतंच, पण तिच्या आजीचं स्वप्न वेगळं होतं. हरमनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, निळी जर्सी घालणं हे तिचं स्वप्न होतं, तर आजीला तिला पोलिसांच्या गणवेशात पाहायचं होतं. क्रिकेटमधील तिच्या कामगिरीनंतर 2018 मध्ये पंजाब सरकारने तिला पंजाब पोलिसांमध्ये डीएसपी पद देऊन सन्मानित केलं. त्यामुळे आजीचं स्वप्नही एका अर्थाने पूर्ण झालं.

हरमनप्रीतच्या खेळाबद्दल बोलताना भारताचे माजी प्रशिक्षक W.V रमन यांनी तिच्या संघासाठी काहीतरी करण्याच्या वृत्तीचं कौतुक केलं आहे. तिचे पहिले प्रशिक्षक कमलदीश सिंग यांच्याही मते, हरमन स्वतःपेक्षा संघाला नेहमीच प्राधान्य देते. तिचा स्वभाव आक्रमक आहे आणि संघासाठी काहीतरी करण्याची तिची धडपड कायम दिसते. 2017 चा महिला विश्वचषक हा हरमनप्रीतच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय टप्प्यांपैकी एक ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने 171 धावांची वादळी खेळी करत संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. या खेळीने भारतीय महिला क्रिकेटची ताकद जगासमोर आणण्यात मोठी भूमिका बजावली. पुढे ती भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत राहिली आणि अनेक वर्षं संघाच्या महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक राहिली.

हरमनप्रीतच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर तिचं योगदान फक्त आकडेवारीपुरतं मर्यादित राहत नाही. तिच्या नेतृत्वाच्या काळात भारतीय महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढली, नवीन मुलींना क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहण्याचा आत्मविश्वास मिळाला आणि हरमन स्वतः अनेकांसाठी प्रेरणास्थान बनली. आज हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाचा निरोप घेतला असला, तरी तिचा क्रिकेटमधला प्रवास संपलेला नाही. मोगाच्या मैदानावर मुलांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या त्या मुलीपासून भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधारापर्यंतचा तिचा प्रवास भारतीय महिला क्रिकेटच्या बदलत्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. कर्णधारपदाची जबाबदारी आता दुसऱ्या खेळाडूकडे जाईल, पण भारतीय क्रिकेटला हरमनप्रीत कौरने दिलेली ओळख आणि पुढच्या पिढीवर केलेला प्रभाव नक्कीच कायम राहील.

