केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांमधील कथित घोळाच्या निषेधार्थ विरोधी पक्षांच्या खासदारांनी राजधानी दिल्लीत ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा काढला. मात्र, या आंदोलनावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत, संविधानाने स्थापन केलेल्या स्वायत्त संस्थांना बदनाम करण्याचे पद्धतशीर काम सुरू असल्याचा आरोप केला आहे.

‘स्वायत्त संस्थांना बदनाम करून संविधानावर प्रश्नचिन्ह’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, देशातील जनतेमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचे पद्धतशीर काम विरोधकांकडून सुरू आहे. संविधानाने स्थापन केलेल्या स्वायत्त संस्थांना बदनाम करायचे आणि त्याआडून थेट संविधानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, हेच विरोधकांचे मूळ षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग ही संविधानाने स्थापन केलेली स्वायत्त संस्था असून, या संस्थेच्या विश्वासार्हतेवर आघात करून देशाच्या लोकशाही व्यवस्थेलाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.
राहुल गांधी, प्रियांका गांधी बॅरिकेड्सवर
दरम्यान, विरोधी पक्षांच्या खासदारांनी नवी दिल्लीतील नवीन संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या ‘निर्वाचन सदन’ मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संसद परिसरातून मोर्चा बाहेर पडल्यानंतर आकाशवाणी भवनाजवळ दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून आंदोलकांना रोखले. पोलिसांनी पुढे जाण्यास मज्जाव केल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बॅरिकेड्सवर चढून आंदोलन केले. हातात तिरंगा घेतलेल्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
पोलिसांकडून नेत्यांना ताब्यात
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह इतर काही प्रमुख खासदारांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांच्या बसमध्ये बसवण्यात आले. मात्र, काही वेळाने हे नेते बसमधून खाली उतरले आणि पुन्हा आंदोलनस्थळी परतण्याचा प्रयत्न केला. यानंतर विरोधी खासदारांनी पुन्हा घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला.
मतदार याद्यांवरून विरोधक आक्रमक
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. विशेष सखोल पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणात वैध मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, देशभरातील मतदार याद्यांमधून तब्बल १३ कोटी वैध मतदारांची नावे संशयास्पद पद्धतीने वगळण्यात आली आहेत. या आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून राजकीय वातावरण तापले आहे.
‘नियमबद्ध प्रक्रियेला विरोध का?’
दरम्यान, निवडणूक आयोग आपल्या नियमानुसार काम करत असताना केवळ राजकीय फायद्यासाठी संस्थांवर चिखलफेक करणे निंदनीय असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी त्याची नियमबद्ध प्रक्रिया समजून घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘इंडिया’ आघाडीत समन्वयाचा अभाव?
या मोर्चात १९ विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. मात्र, आम आदमी पक्ष आणि तामिळनाडूतील द्रमुक या प्रमुख घटक पक्षांचा मोर्चातील सहभाग नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांच्या या आंदोलनातून ‘इंडिया’ आघाडीतील अंतर्गत मतभेद आणि समन्वयाचा अभाव समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
पुन्हा एकदा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
यापूर्वीही विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावरून संसद ते निवडणूक आयोग असा मोर्चा काढला होता. आता पुन्हा एकदा विरोधक रस्त्यावर उतरले असून, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.एका बाजूला विरोधकांकडून मतदार याद्यांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप केला जात आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाकडून हे आरोप संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

