
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण आदेश दिले. या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्याचे, तसेच दिशा यांचे वडील सतीश सालियान यांच्या तक्रारीच्या आधारे FIR दाखल करून तपास करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. दिशा सालियान यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी करत सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने CBIच्या मुंबई विभागातील संयुक्त संचालकांना वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्याने सतीश सालियान यांचा जबाब नोंदवून त्याआधारे FIR दाखल करावी, तसेच मुंबई पोलिसांकडील संबंधित कागदपत्रे CBIकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुरावे मिळाल्याशिवाय आरोपी ठरवू नये
तपासात पुरेसे पुरावे मिळाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला आरोपी ठरवू नये, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. तपासानंतर सतीश सालियान यांना CBIच्या निष्कर्षांवर आक्षेप घेण्याचा कायदेशीर अधिकारही राहणार आहे. दिशा सालियान यांच्या मृत्यूला सहा वर्षे उलटल्यानंतर या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्याच्या आदेशामुळे प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.

