बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ज्वेलरी ब्रँड GIVA च्या रक्षाबंधनासाठी तयार बनवल्या गेलेल्या नव्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. या जाहिरातीत कृति इंडो-वेस्टर्न लूकमध्ये दिसते आणि आपल्या पेट कुत्र्याला राखी बांधताना दाखवण्यात आली आहे. काही लोकांना हा प्रयोग आवडला असला, तरी एका वर्गाने या संकल्पनेवर आणि मुख्यतः कृतीच्या कपड्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जाहिरातीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण जाहिरातीवरून वाद निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक मोठ्या ब्रँड्सना त्यांच्या जाहिरातींमुळे टीकेचा सामना करावा लागला आहे. पाहुयात अशा काही जाहिराती ज्यांनी याचप्रकारे प्रेक्षकांची नाराजी ओढवून घेतली होती.

१- तनिष्क

2020 मध्ये तनिष्कच्या एका जाहिरातीवर मोठा वाद झाला होता. मुस्लिम कुटुंब हिंदू सुनेसाठी डोहाळेजेवणाचा कार्यक्रम आयोजित करत असल्याचं या जाहिरातीत दाखवण्यात आलं होतं. धार्मिक सलोख्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असूनही जाहिरातीवर टीका झाली आणि बहिष्काराची मागणीही झाली. अखेर तनिष्कने जाहिरात मागे घेतली.
२- फॅबइंडिया

2021 मध्ये फॅबइंडियाच्या ‘जश्न-ए-रिवाज’ या दिवाळी कलेक्शनच्या कॅम्पेनवरूनही वाद झाला. दिवाळीच्या जाहिरातीत उर्दू नाव वापरल्यावर काही राजकीय नेते आणि सोशल मीडिया यूजर्सनी आक्षेप घेतला. विरोधानंतर कंपनीने कॅम्पेनचं नाव बदलून ‘झिलमिल सी दिवाली’ केलं.
३- मान्यवर मोहे

याच वर्षी मान्यवर मोहेच्या आलिया भट्ट अभिनीत ‘कन्यामान’ जाहिरातीनेही चर्चा निर्माण केली. ‘कन्यादान’ या पारंपरिक संकल्पनेऐवजी मुलीचा सन्मान अधोरेखित करण्याचा प्रयत्न या जाहिरातीत करण्यात आला होता. मात्र काही लोकांनी हिंदू विवाहपरंपरेचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप केला.
४- डाबर

डाबरच्या करवा चौथच्या जाहिरातीवरही 2021 मध्ये वाद झाला. यात समलिंगी जोडप्याला करवा चौथ साजरा करताना दाखवण्यात आलं होतं. LGBTQ+ समुदायाचं प्रतिनिधित्व करण्याच्या प्रयत्नाचं काहींनी स्वागत केलं, तर काही राजकीय आणि सामाजिक गटांनी त्याला विरोध केला.
५- झोमॅटो

2022 मध्ये झोमॅटोच्या ऋतिक रोशनच्या जाहिरातीवरूनही वाद झाला. ‘महाकाल’चा उल्लेख केल्यामुळे उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला. वाद वाढल्यानंतर झोमॅटोने स्पष्टीकरण देत जाहिरात मागे घेतली.
६- AU स्मॉल फायनान्स बँक

त्याच वर्षी AU स्मॉल फायनान्स बँकच्या आमिर खान आणि कियारा अडवाणी यांच्या जाहिरातीवरही टीका झाली. पारंपरिक विदाईच्या उलट दुल्हनच्या घरी वर जात असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पारंपरिक लिंगभुमिकांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न म्हणून ही जाहिरात करण्यात आली होती, पण त्यावरही विरोध झाला.
७- सर्फ एक्सेल

2019 मध्ये सर्फ एक्सेलच्या होलीच्या जाहिरातीवरूनही मोठा वाद झाला होता. एका हिंदू मुलीने मुस्लिम मुलाला रंगांपासून वाचवत नमाजासाठी मशिदीत पोहोचवल्याचं जाहिरातीत दाखवलं होतं. या संदेशाचं अनेकांनी कौतुक केलं, तर काहींनी त्यावर धार्मिक कारणांवरून टीका केली.
त्यामुळे कृति सेननची सध्याची जाहिरात हा जाहिरातीभोवती निर्माण झालेल्या वादांच्या मोठ्या मालिकेतला आणखी एक भाग म्हणता येईल. एखादी जाहिरात पारंपरिक विचारांना वेगळ्या पद्धतीने मांडते, तेव्हा तिचं कौतुक होतं किंवा विरोध… पण सोशल मीडियाच्या काळात काही सेकंदांची जाहिरातही मोठ्या चर्चेचा विषय होऊ शकते.

