
तुमचं नाव मतदार यादीत आहे म्हणून निश्चिंत राहू नका! महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये SIR प्रक्रियेनंतर तयार करण्यात आलेल्या ड्राफ्ट मतदार यादीत लाखो मतदारांची नावं दिसत नसल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात तब्बल 2 कोटी 7 लाख मतदारांची नावं ड्राफ्ट यादीत नाहीत. तर दिल्लीत 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावं प्रारुप यादीतून बाहेर आहेत. पण याचा अर्थ या सगळ्या लोकांचं मतदानाचं हक्क कायमचा संपला, असा अजिबात नाही.
नेमकं झालं तरी काय?
SIR म्हणजे Special Intensive Revision. सोप्या भाषेत सांगायचं तर, मतदार यादी पुन्हा तपासून ती अपडेट करण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत मतदारांच्या घरी जाऊन माहिती तपासण्यात आली. काही लोकांचे फॉर्म जमा झाले नाहीत, काहींची माहिती डिजिटाईज झाली नाही, तर काही मतदार स्थलांतरित किंवा उपलब्ध नसल्याचं आढळलं. याशिवाय मृत व्यक्तींची नावं, डुप्लिकेट नोंदी, विदेशी नागरिक किंवा इतर कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या नोंदी देखील तपासण्यात आल्या. म्हणूनच ड्राफ्ट यादीत अनेकांची नावं दिसत नाहीयेत.
महाराष्ट्रात किती नावं गायब?
महाराष्ट्रातील एकूण मतदारांपैकी सुमारे 2 कोटी 7 लाख मतदारांची नावं ड्राफ्ट रोलमध्ये आलेली नाहीत. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे SIR प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला फॉर्म जमा न होणं. त्यामुळे संबंधित मतदारांचा रेकॉर्ड डिजिटाईज होऊ शकला नाही.
दिल्लीत काय स्थिती?
दिल्लीत सुमारे 1 कोटी 45 लाख नोंदणीकृत मतदार आहेत. त्यापैकी 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावं ड्राफ्ट यादीत नाहीत. तर सुमारे 97 लाख 53 हजार 507 मतदारांचा रेकॉर्ड डिजिटाईज झालेला आहे.
आता तुमचं नाव नसेल तर काय करायचं?
सगळ्यात आधी घाबरायचं नाही! 31 ऑगस्टपासून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत तुमच्याकडे दावा किंवा हरकत दाखल करण्याची संधी आहे. जर तुमचं नाव ड्राफ्ट यादीत नसेल तर Form 6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावा करता येईल. तुम्हाला मतदार यादीतील एखाद्या अपात्र व्यक्तीच्या नावावर आक्षेप घ्यायचा असेल, तर Form 7 वापरता येईल. तसंच तुमच्या मतदार ओळखपत्रात म्हणजेच EPIC मध्ये नाव, पत्ता किंवा इतर तपशील चुकीचा असेल, तर Form 8 भरता येईल.
नाव कुठे तपासायचं?
तुमचं नाव ड्राफ्ट मतदार यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर जा: voters.eci.gov.इन तिथे तुमचं नाव तपासा. नाव सापडलं नाही, तर दावा दाखल करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा.
ही तारीख अजिबात विसरू नका!
30 सप्टेंबर 2026 — दावा/हरकत दाखल करण्याची अंतिम तारीख.
29 ऑक्टोबर 2026 — दावे आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत.
4 नोव्हेंबर 2026 — अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार.
म्हणूनच “माझं नाव आधीपासून मतदार यादीत आहे, त्यामुळे काही करण्याची गरज नाही” असं समजून दुर्लक्ष करू नका. एकदा तुमचं नाव ड्राफ्ट यादीत आहे की नाही, हे नक्की तपासा.

