बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि दिलखेचक अदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी दीक्षित लोकप्रिय क्विझ शो ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर नवा अंदाज दाखवणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या शोसाठी होकार देण्यामागचं कारणही माधुरीने स्वतः सांगितलं आहे.
सामान्य माणसांच्या कथा माधुरीला भावल्या

‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या आयुष्यातील कथा, त्यांचा संघर्ष आणि त्यांची स्वप्नं आपल्याला प्रभावित करतात, असं माधुरीने सांगितलं. तिच्यासाठी हा कार्यक्रम केवळ प्रश्नांची उत्तरं देऊन पैसे जिंकण्यापुरता मर्यादित नाही. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं आणि ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासाने प्रयत्न करणं, हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग असल्याचं माधुरीचं म्हणणं आहे. स्पर्धकांच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यांच्या स्वप्नांमागची मेहनत जवळून जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार असल्याने ती या नव्या भूमिकेसाठी उत्सुक आहे.
सूत्रसंचालनातून दिसणार माधुरीचा वेगळा अंदाज

अभिनय करताना कलाकाराला एखाद्या व्यक्तिरेखेत शिरावं लागतं. मात्र, सूत्रसंचालन करताना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वासह प्रेक्षकांसमोर राहण्याची संधी मिळते, असं माधुरीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ‘कोण होणार करोडपती’मध्ये तिचा अधिक सहज, उत्स्फूर्त आणि मनमोकळा अंदाज पाहायला मिळणार आहे. स्पर्धकांसोबत गप्पा मारणं, त्यांच्या भावना जाणून घेणं, हसणं-खेळणं आणि अचानक घडणारे मजेशीर क्षण अनुभवणं, यासाठी माधुरी विशेष उत्सुक आहे. लोकांशी संवाद साधायला आपल्याला आवडतं, असं सांगत तिने या शोच्या माध्यमातून स्पर्धक आणि प्रेक्षकांसोबत खास क्षण शेअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माधुरी दीक्षितच्या या नव्या भूमिकेमुळे ‘कोण होणार करोडपती’ला एक वेगळा रंग मिळणार असून, तिचा छोट्या पडद्यावरील हा नवा अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

