मुंबईत अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना दैनंदिन व्यवहारासाठी मराठी भाषा शिकवण्याच्या उपक्रमाचा समारोपाचा कार्यक्रम सध्या चर्चेत आला आहे. बोरिवलीतील कोरा केंद्र मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रशिक्षणासाठी आयोजित कार्यक्रमावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत सुमारे 20 हजार रिक्षा आणि टॅक्सीचालकांना प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे देण्यात आली.

उपक्रम मराठीचा, मग भोजपुरी गाण्यांवर नृत्य का?
मुंबई आणि पश्चिम उपनगरात काम करणाऱ्या अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांना प्रवाशांशी मराठीत सहज संवाद साधता यावा, यासाठी हा प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात आला होता. प्रवाशांकडून पत्ता समजून घेणे, भाडे सांगणे आणि रोजच्या व्यवहारात वापरली जाणारी साधी मराठी यासाठी चालकांना प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र वितरणासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भोजपुरी गाण्यांवर नृत्य सादर झाल्याने आता या मुद्द्याची चर्चा सुरू झाली आहे.
मंचावर शिवाजी महाराज, बाळासाहेब आणि आनंद दिघेंच्या प्रतिमा
या कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी आक्षेप घेतला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. त्याच ठिकाणी भोजपुरी गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आल्याचा दावा करत चित्रे यांनी आयोजकांवर टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या प्रकारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अखिल चित्रेंचा प्रकाश सुर्वेंना सवाल
अखिल चित्रे यांनी या प्रकारावरून आमदार प्रकाश सुर्वे आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता याबाबत भूमिका मांडणाऱ्या पक्षाच्या कार्यक्रमातच अशा प्रकारचं नृत्य कसं झालं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच, व्यासपीठावर शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा असताना हा कार्यक्रम योग्य पद्धतीने आयोजित करण्यात आला का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
एकनाथ शिंदेंची उपस्थितीही चर्चेत
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. त्यामुळे नृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय चर्चेला आणखी उधाण आलं आहे. ठाकरे गटाने या मुद्द्याचा वापर करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मात्र, कार्यक्रमातील भोजपुरी गाण्यांवर नृत्य सादर करण्यामागे आयोजकांचा नेमका उद्देश काय होता, याबाबत त्यांचं स्पष्टीकरण अद्याप समोर आलेलं नाही.
20 हजार चालकांना मराठीचं प्रशिक्षण
या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मूळ उपक्रमाचा उद्देश मात्र अमराठी चालकांना मराठी भाषेची ओळख करून देणे हा होता. सुमारे 20 हजार रिक्षा आणि टॅक्सीचालकांना व्यावहारिक मराठीचं प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देण्यात आलं. मुंबईत प्रवासी आणि चालकांमधील संवाद अधिक सुलभ व्हावा, हा या उपक्रमामागचा हेतू असल्याचं सांगण्यात आलं.
आता राजकीय वादाची नवी ठिणगी
मराठी भाषेच्या वापरासाठी राबवलेल्या उपक्रमाचा मुद्दा आधीच मुंबईच्या राजकारणात संवेदनशील आहे. त्यातच प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर नृत्य झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने ठाकरे गटाला सत्ताधारी गटावर टीका करण्यासाठी नवा मुद्दा मिळाला आहे. त्यामुळे भोजपुरी गाण्यांवरील नृत्य नेमकं का ठेवण्यात आलं होतं आणि यावर आयोजक काय भूमिका मांडणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.

