
शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेती पंपांची जुनी वीजबिलं माफ करण्याची मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ही घोषणा केली. शेतीला पाणी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 7.5 HP पर्यंतच्या मोटार पंपांची अनेक वर्षांची थकीत वीजबिलं आता माफ केली जाणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक शेतकऱ्यांच्या नावावर जुनी वीजबिलं अजूनही बाकी आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांची वसुली होऊ शकते. इतकंच नाही, तर ही थकबाकी भरल्याशिवाय नवीन वीज जोडणी मिळण्यातही अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी सुमारे 48 हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिलं माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांची जुनी थकबाकी संपली पाहिजे आणि त्यांना नव्याने शेती सुरू करता आली पाहिजे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
यासोबतच आणखी एक मोठं उद्दिष्ट म्हणजे या वर्षाअखेर राज्यातील 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसातून 12 तास वीज देण्याचंही सरकारचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. फडणवीस यांनी शेतीत नवीन तंत्रज्ञान, उत्पादन खर्च कमी करणे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यावरही भर दिला. “मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहीत आहेत,” असंही ते यावेळी म्हणाले.
या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं थकीत वीजबिलाचं ओझं कमी होणार असून, नव्याने शेती करण्यासाठी त्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

