राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील तब्बल 15 हजार 636 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. पण असं का होऊ शकतं?
2024, 2025 आणि 2026 मध्ये ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला, त्या ठिकाणी यावर्षी निवडणुका होतील, अशी अपेक्षा होती. त्यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून 10 जुलैला अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे.

पण यावेळी एक नवीन अडथळा आला आहे. सध्या मतदारयादी अपडेट करण्याचं काम सुरू आहे. या प्रक्रियेत मृत, गाव सोडून गेलेले आणि अपात्र मतदारांची नावे मतदारयादीतून काढली जात आहेत, जेणेकरून मतदान अधिक पारदर्शक होईल.

ही अंतिम मतदारयादी 7 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर प्रत्येक प्रभागाची स्वतंत्र मतदारयादी तयार करावी लागेल. त्यासाठीही साधारण एक ते दीड महिना लागू शकतो.
म्हणूनच निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक पुढे जाण्याची शक्यता आहे. जर असंच झालं, तर यावर्षी निवडणुका न होता त्या थेट 2027 च्या सुरुवातीला होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
मात्र, महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सध्या ही फक्त शक्यता आहे. अंतिम निर्णय आयोगाकडून निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

