आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 6 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व हलक्या आणि जड वाहनांना राज्यातील टोलनाक्यांवर टोल भरावा लागणार नाही.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अधिकृत परिपत्रक काढले आहे. या निर्णयाचा फायदा 10 मानाच्या पालख्यांसोबत जाणाऱ्या वाहनांबरोबरच इतर खासगी वाहनांनाही होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास कमी खर्चात होणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, टोलमाफीचा पास परतीच्या प्रवासातही वापरता येणार आहे. टोलनाक्यांवर गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक टोलनाक्यावर पोलिसांची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
वारीच्या काळात भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठीही सरकारने विशेष तयारी केली आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर दर 20 ते 25 किलोमीटरवर रुग्णवाहिका आणि क्रेन तैनात असणार आहेत. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्यास ते तातडीने बुजवण्यासाठी आवश्यक साहित्यही उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.

याशिवाय, वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन परिवहन विभागाला अतिरिक्त एसटी बस आणि इतर वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे यंदाची पंढरपूर वारी वारकऱ्यांसाठी अधिक सोयीची, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरणार आहे.

