भारतात शिक्षणाच्या क्षेत्रात एक मोठी आणि सकारात्मक घडामोड समोर आली आहे. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडने आता देशातील पूर्ण साक्षर राज्यांच्या यादीत आपले स्थान मिळवले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये साक्षरता वाढवण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे उत्तराखंडने हा ऐतिहासिक टप्पा गाठला असून देशभरातून या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
उत्तराखंडने अल्प कालावधीत साक्षरतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. 2023-24 मध्ये राज्याचा साक्षरता दर सुमारे 83.8 टक्के इतका होता. मात्र विविध शैक्षणिक उपक्रम, जनजागृती मोहीम आणि प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 2025 पर्यंत हा आकडा तब्बल 98.7 टक्क्यांपर्यंत पोहोचला. जवळपास 14.9 टक्क्यांची वाढ नोंदवत उत्तराखंडने देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

उत्तराखंड हा हा मान मिळवणारा पहिला राज्य नाही. याआधीही भारतातील अनेक राज्यांनी पूर्ण साक्षरतेचा मान मिळवला आहे. सर्वप्रथम मिझोरमने सुमारे 98.2 टक्के साक्षरता दरासह देशातील पहिल्या पूर्ण साक्षर राज्याचा दर्जा मिळवला. त्यानंतर गोव्यानेही जवळपास शतप्रतिशत साक्षरतेचा टप्पा गाठत या यादीत आपले स्थान निश्चित केले.
पूर्वोत्तर भारतातील त्रिपुरानेही शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी करत 95.6 टक्के साक्षरता दरासह पूर्ण साक्षर राज्यांमध्ये नाव नोंदवले. त्यानंतर हिमाचल प्रदेशने शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि वाढीव गुंतवणुकीच्या जोरावर 99.3 टक्के साक्षरता दर गाठला. सिक्कीमनेही 99.82 टक्के साक्षरता दर नोंदवत देशातील पूर्ण साक्षर राज्यांमध्ये स्थान मिळवले.

आता या गौरवशाली यादीत उत्तराखंडची भर पडली आहे. यामुळे भारतात पूर्ण साक्षरतेचे उद्दिष्ट गाठणाऱ्या राज्यांची संख्या सहा झाली आहे. ही कामगिरी केवळ उत्तराखंडसाठीच नाही, तर संपूर्ण देशाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

