NEET UG 2026 च्या फेरपरीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 21 जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांवरून 195 मिनिटांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत होणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार रफ वर्कसाठी उपलब्ध जागाही वाढवण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला आणि शेवटी मिळून आता चार पाने रफ कामासाठी उपलब्ध असतील. यापूर्वी ही संख्या दोन पानांपुरती मर्यादित होती.

पेपरफुटीच्या आरोपांनंतर रद्द करण्यात आलेल्या NEET परीक्षेची पुनर्परीक्षा 21 जून रोजी घेतली जाणार आहे. वर्षभर मेहनत घेऊन परीक्षा दिल्यानंतर ती रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. ही अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी NTA ने अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, NTA ने स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. आधी भरलेली परीक्षा फी वैध राहणार असून नवीन प्रवेशपत्र (Admit Card) मात्र जारी केले जाणार आहे. परीक्षा केंद्रांच्या बाबतीत अंतिम निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. राजस्थानातील सीकर येथे कथित ‘गेस पेपर’मधील अनेक प्रश्न मूळ परीक्षेशी जुळल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर चौकशी सुरू करण्यात आली होती. प्राथमिक तपासातील निष्कर्षांनंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता 21 जूनच्या पुनर्परीक्षेकडे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

