पुण्यातील स्वारगेट ते कात्रज हा सुमारे सहा किलोमीटरचा बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) आठवतोय का? एकेकाळी शहराच्या आधुनिक वाहतुकीचं प्रतीक मानला गेलेला हा प्रकल्प आता पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे. पुण्यातील स्वारगेट ते कात्रज हा जवळपास ६ किलोमीटरचा BRT मार्ग आता बंद होण्याची शक्यता आहे. कारण स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग २००६ मध्ये सुरू झाला होता आणि तो देशातील पहिलाच BRT प्रयोग मानला जात होता. कोलंबियातील बोगोटा शहराच्या धर्तीवर पुण्यात हा प्रकल्प आणण्यात आला होता. उद्देश एकच बस प्रवास जलद, सुरक्षित आणि शिस्तबद्ध करणे.

रस्त्याच्या मधोमध बससाठी वेगळी लेन, मध्यभागी बसस्टॉप आणि खास बस सेवा असणारा हा प्रकल्प त्या काळात खूप मोठा बदल मानला गेला होता.
यानंतर नगर रोड, सोलापूर रोड, पिंपरी-चिंचवड अशा अनेक भागांत BRT सुरू करण्यात आला. पण हळूहळू समस्या वाढत गेल्या.
BRT लेनमध्ये इतर वाहनांची घुसखोरी, सततचं ट्रॅफिक, अपघात आणि तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प टीकेचा विषय बनला.

परिणामी, शहरातील अनेक BRT मार्ग टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले आणि आता स्वारगेट-कात्रज हा शेवटचा प्रमुख मार्गही बंद होण्याच्या मार्गावर आहे.
सध्या मेट्रो कामामुळे अरण्येश्वर ते पद्मावती दरम्यानचा काही भाग आधीच हटवण्यात आला आहे. पुढे काम वाढत गेलं, तर उर्वरित BRT मार्गही बंद होऊ शकतो. एकेकाळी ‘फ्युचर ट्रान्सपोर्ट’ म्हणून पाहिलेला पुण्याचा BRT प्रकल्प आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

