सोलापूर जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न आता चांगलाच तापला आहे. ऊसाला पहिली उचल म्हणून 3500 रुपये मिळावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यांच्या आवाहनानंतर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरीही आक्रमक झाले असून, माढा तालुक्यात शेतकऱ्यांनी ऊस वाहतुकीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखण्यात आले असून, वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरची चाकं फोडण्याचा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. जोपर्यंत ऊसाला पहिली उचल 3500 रुपये मिळत नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांचं गाळप सुरू करू दिलं जाणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
या आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच 19 नोव्हेंबरला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार आणि शेतकरी प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत ऊसदरावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, 3500 रुपयांच्या पहिल्या उचलीबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
याआधी 16 नोव्हेंबरला राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनानंतर प्रशासनाने मध्यस्थी केली. रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी 19 नोव्हेंबरच्या बैठकीपर्यंत जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच या बैठकीला कारखान्यांचे प्रतिनिधी नव्हे, तर चेअरमन यांनी स्वतः उपस्थित राहावे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी या आदेशाची प्रत राजू शेट्टी यांच्याकडे दिली. त्यानंतर प्रशासनाच्या विनंतीला मान देत संघटनेने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

मात्र, राजू शेट्टी यांनी सरकार आणि साखर कारखानदारांना स्पष्ट इशारा दिला आहे. 19 नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीला मान्यता मिळाली नाही, तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निर्णायक आंदोलन छेडण्यात येईल. एवढंच नाही, तर जिल्ह्याला जोडणारे सर्व राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासोबतच सोलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलनही करण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलं आहे. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहनही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे.
त्यामुळे आता सोलापूरमधील ऊसदराचा प्रश्न 19 नोव्हेंबरच्या बैठकीवर येऊन ठेपला आहे. एका बाजूला ३५०० रुपयांच्या पहिल्या उचलीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार आणि प्रशासनासमोर तोडगा काढण्याचं आव्हान आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळतो की आंदोलनाचा वणवा आणखी पेटतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

