Skip to content
Lagav Batti | Header
ताज्या बातम्या
माहिती लोड होत आहे...
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा सामाजिक वेब स्टोरीज
Lagav Batti
राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

राजस्थान रेल्वे स्फोट: प्रेमसंबंध, पैशांचं आमिष अन् पाकिस्तान कनेक्शन; महकदीप कौर कोण?

By Team Lagav Batti / November 16, 2026

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये रेल्वे रुळांवर झालेल्या स्फोटाच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पंजाबमधील २१ वर्षीय महकदीप कौर आणि २३ वर्षीय देवेंद्र सिंह यांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार, या स्फोटामागे पाकिस्तानमधील कथित हँडलर्सचा हात असून सोशल मीडिया संपर्क, प्रेमसंबंध आणि पैशांचं आमिष दाखवून दोघांना कटात सहभागी करण्यात आलं.

या प्रकरणाची सुरुवात ३ नोव्हेंबरच्या रात्री झाली. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनूपगड-सूरतगड रेल्वेमार्गावर रामसिंहपूर परिसरात मोठा स्फोट झाला. यात रेल्वे रुळांखालील दोन काँक्रीटचे स्लीपर तुटले आणि जमिनीत दोन फूट खोल खड्डा पडला. सुदैवाने, स्फोटाच्या ७५ मिनिटे आधीच या मार्गावरून प्रवासी ट्रेन गेली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दुरुस्तीनंतर ५ नोव्हेंबरला रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली. मात्र, हा ट्रेन घसरवण्याचा कट असल्याचा संशय आल्याने राजस्थान पोलीस आणि एटीएसने तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन आणि सोशल मीडिया अकाउंट्स तपासताना तपासाचे धागेदोरे पंजाबपर्यंत पोहोचले.

१४ नोव्हेंबरला राजस्थान आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुरुदासपूरमधून महकदीप कौर आणि देवेंद्र सिंह यांना अटक केली. महकदीप ही दोस्तपूर गावची, तर देवेंद्र चौडेकलां गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तुलंही जप्त केली आहेत. महकदीपच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी तिने प्रेमविवाह केला होता. मात्र, पतीसोबत वाद झाल्याने तिने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि ती वेगळी राहू लागली. याच काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा पाकिस्तानमधील दोन व्यक्तींशी संपर्क आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यांना ‘शाह’ आणि ‘चाचा’ अशा कोडनेमने ओळखलं जात होतं. काही वृत्तांमध्ये ‘मूसा’ हे नावही समोर आलं आहे. हे लोक आयएसआयशी संबंधित असावेत, असा तपास यंत्रणांना संशय आहे. सुरुवातीला संवाद सुरू झाला आणि पुढे वैयक्तिक संबंध निर्माण झाले. याच माध्यमातून महकदीपला पैशांचं आमिष दाखवून कटात सहभागी केल्याचा आरोप आहे.

महकदीपसोबत देवेंद्र सिंहही या प्रकरणात सहभागी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पाकिस्तानमधून मिळणाऱ्या सूचनांनुसार रेल्वे रुळांवर स्फोट घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यासाठी दोघांना ऑनलाइन पैसे पाठवले जात होते, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. विशेष म्हणजे, ३ नोव्हेंबरचा स्फोट हा पहिलाच प्रयत्न नव्हता. १२ आणि १३ ऑक्टोबरदरम्यान रेल्वे रुळांवर टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे त्याचा स्फोट झाला नाही. त्यानंतर ३ नोव्हेंबरला दुसऱ्या टाइम बॉम्बच्या साहाय्याने स्फोट घडवण्यात आल्याचा आरोप आहे. हा बॉम्ब पाकिस्तानमधील कथित हँडलरने पुरवल्याचा संशय आहे.

दरम्यान, महकदीपच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती अनेक दिवस घराबाहेर राहत होती. ती कुठे जाते, याची माहितीही घरच्यांना देत नव्हती. तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि स्वतःच्या इच्छेने लग्न केलं होतं, असं तिच्या आईने सांगितलं.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पाकिस्तानमधील कथित हँडलर्स नेमके कोण आहेत, पैसे कुठून पाठवले जात होते आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, पोलिसांचे हे आरोप अद्याप तपासाच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे महकदीपची नेमकी भूमिका आणि या कटामागचं संपूर्ण सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

Previous

US Flights Grounded: अमेरिकेत एअर ट्रॅफिक कंट्रोल यंत्रणेत बिघाड; हजारो उड्डाणे रद्द, 15 लाख प्रवाशांना फटका

Next

अजितदादांच्या अपघाताबाबत फडणवीसांची अमित शाहांसमोर मोठी मागणी.. काय म्हणाले..?

More Posts

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

प्रवासात फोन चार्ज करता? मग ही बातमी नक्की वाचा

Leave a Comment / Uncategorized / By Team Lagav Batti
Saina Nehwal

सायना नेहवालने गुडघ्याच्या गंभीर आजारामुळे घेतली निवृत्ती

Leave a Comment / Uncategorized, क्रीडा / By Team Lagav Batti

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Lagav Batti | Footer Only
Lagav Batti

ताज्या बातम्या, राजकारण, इतिहास, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील अचूक आणि निष्पक्ष माहितीसाठी 'लगाव बत्ती' तुमच्या सोबत आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

राजकारण इतिहास पर्यावरण क्रीडा वेब स्टोरीज

आमच्याशी जोडा

© Lagav Batti. All rights reserved.

Scroll to Top