स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारताच्या भविष्यातील वाटचालीचा रोडमॅप मांडताना तंत्रज्ञान, ऊर्जा, रेल्वे, MSME, हरित ऊर्जा आणि आर्थिक आत्मनिर्भरतेवर भर दिला. जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि विविध संकटांचा संदर्भ देत भारताने कोणत्याही दबावाला न घाबरता स्वतःची क्षमता वाढवण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले. 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी मोठी स्वप्नं आणि ठोस संकल्प आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

1. एका वर्षात 1 कोटी तरुणांना AI ट्रेनिंग
भारताला तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनचं जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने मोठी घोषणा करण्यात आली. देशातील 1 कोटी तरुणांना एका वर्षात AIचं प्रशिक्षण देण्याचा संकल्प मोदींनी मांडला. AIचा वापर रोजगार, शिक्षण आणि उद्योगांच्या विस्तारासाठी करण्यावर सरकारचा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
2. सात मोठ्या सुधारणांचा अजेंडा
विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी 7-पॉइंट रिफॉर्म्स अजेंडा, म्हणजेच ‘सप्तशक्ती’चा उल्लेख मोदींनी केला. सुधारणा ही केवळ परिस्थितीमुळे करावी लागणारी गोष्ट नसून ती देशाच्या विकासासाठीची बांधिलकी असल्याचं त्यांनी सांगितलं.
3. आत्मनिर्भर भारतावर पुन्हा जोर
जागतिक युद्ध आणि आर्थिक अस्थिरतेचा उल्लेख करत मोदींनी भारताने परदेशावरील अवलंबित्व कमी करण्याची गरज व्यक्त केली. इंधन आणि खतांच्या पुरवठ्यासारख्या क्षेत्रांत निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना भारताने केला असून आता स्वतःची उत्पादनक्षमता आणि क्षमता वाढवणं हाच पुढचा मार्ग असल्याचं त्यांनी सांगितलं.
4. 2047 पर्यंत विकसित भारत
भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा म्हणजेच 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचं लक्ष्य मोदींनी पुन्हा अधोरेखित केलं. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक प्रयत्नांतून हे उद्दिष्ट साध्य होऊ शकतं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
5. पाइप गॅसचा विस्तार
देशातील पाइपद्वारे गॅस पुरवठ्याच्या विस्ताराचा उल्लेख करत मोदींनी सांगितलं की, पूर्वी सुमारे 70 शहरांपर्यंत असलेली सुविधा आता 700 शहरांपर्यंत पोहोचली आहे. घरगुती पाइप गॅस जोडण्यांची संख्याही वाढून सुमारे 1.75 कोटी घरांपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं.
6. सौर ऊर्जेतून वीज आणि कमाई
हरित ऊर्जेच्या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा उल्लेख करत मोदींनी सौर ऊर्जेची क्षमता वाढल्याचं सांगितलं. ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजने’अंतर्गत 50 लाख घरांना सौर ऊर्जेचा लाभ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. काही कुटुंबांचं वीज बिल शून्यावर गेलं असून अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळवण्याची संधीही निर्माण झाल्याचं मोदी म्हणाले.
7. रेल्वेचं वेगाने विद्युतीकरण
भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचाही भाषणात उल्लेख झाला. देशातील 70 टक्क्यांहून अधिक रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण झाल्याचं मोदींनी सांगितलं. यासोबतच भारतात हायड्रोजन ट्रेन सुरू झाल्याचा उल्लेख करत पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
8. भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ
भारताने विविध देशांसोबत केलेल्या व्यापारी करारांचा फायदा भारतीय शेतकरी आणि MSME क्षेत्राला होऊ शकतो, असं मोदींनी सांगितलं. भारतीय उत्पादनांची गुणवत्ता हीच देशाची ओळख बनली पाहिजे आणि ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळालं पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.
9. ‘वैचारिक नक्षलवादा’वर निशाणा
हिंसक नक्षलवाद संपुष्टात येत असल्याचा दावा करत मोदींनी समाजात फूट पाडणाऱ्या विचारसरणींवरही निशाणा साधला. देशाच्या एकतेला आणि सामाजिक सलोख्याला धोका निर्माण करणाऱ्या ‘वैचारिक नक्षलवादा’ला ओळखून त्याला रोखण्याचं आवाहन त्यांनी केलं.
10. भारताच्या सामर्थ्यावर जगाचा विश्वास
भारताकडे राजकीय स्थैर्य, संविधान आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था यांसारख्या मजबूत संस्था असल्याचं मोदींनी सांगितलं. भारतीय उत्पादनं जगभर पोहोचत असून जागतिक पातळीवर भारताच्या क्षमतेची दखल घेतली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

लाल किल्ल्यावरून आत्मनिर्भरतेचा स्पष्ट संदेश
यंदाच्या भाषणात तंत्रज्ञानापासून ऊर्जा, रेल्वेपासून उद्योग आणि सुधारणांपासून 2047च्या लक्ष्यापर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश होता. मोठी स्वप्नं, मोठे संकल्प आणि आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून विकसित राष्ट्राचा प्रवास हा मोदींच्या भाषणाचा मुख्य सूर राहिला.

