बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी तब्बल 37 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. मात्र या ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

हे पुस्तक 1988 साली प्रकाशित झाले असून, डाव्या विचारसरणीचे नेते आणि लेखक गोविंद पानसरे यांनी ते लिहिले आहे. या पुस्तकाच्या शीर्षकात आणि मजकुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत गायकवाड यांनी आंबी यांना फोन केल्याचे सांगितले जाते. या संभाषणादरम्यान त्यांनी अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा करण्यात येत आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रकाशक प्रशांत आंबी यांनी सांगितले की, त्यांनी जवळपास 9 मिनिटे गायकवाड यांच्याशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला की पुस्तकातील ‘जी’ हा आदरार्थी वापर असून, त्यामागे कोणताही अपमानाचा हेतू नाही. मात्र, गायकवाड हे ऐकण्याच्या मानसिकतेत नसून त्यांनी सतत शिवीगाळ केली, असा आरोप आंबी यांनी केला. तसेच “आधी पुस्तक वाचा, मग मत बनवा,” असेही त्यांनी सांगितल्याचे नमूद केले.

दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट करताना, ही ऑडिओ क्लिप ‘तोडून-मोडून’ व्हायरल केल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, शिवाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही आणि त्याच भावनेतून त्यांनी प्रतिक्रिया दिली.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ऐतिहासिक संदर्भ आणि संवेदनशील विषयांवरील संवाद यावर मोठी चर्चा रंगण्याची शक्यता आहे.