
सर्वसामान्यांच्या रोजच्या खर्चात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुण्यातील कात्रज डेअरीच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला राज्यातील 45 सहकारी आणि खासगी दूध ब्रँडचे प्रतिनिधी उपस्थित होते. गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात ही वाढ करण्याचे ठरले आहे. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या ग्राहकांना आता दुधासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
दूध दरवाढीमागे नेमकी कारणं काय?
दूध उत्पादक आणि व्यावसायिकांच्या मते, दूध व्यवसायाचा उत्पादन आणि वितरण खर्च सातत्याने वाढत आहे. साखरेचे दर, डिझेलचे दर आणि डीलर रेटमधील वाढीमुळे व्यवसायावर आर्थिक ताण येत आहे. याशिवाय बाजारात बाहेरील दूध ब्रँडची स्पर्धाही वाढली आहे. या सर्व कारणांमुळे दरवाढ करण्याची वेळ आल्याचं संघाच्या बैठकीत सांगण्यात आलं. यासोबतच दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही सुमारे 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.
अमूल आणि मदर डेअरीनंतर गोकुळचेही दर वाढणार?
दूध दरवाढीचे संकेत केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. अमूलने 12 नोव्हेंबरपासून आपल्या काही दूध प्रकारांच्या किमती वाढवल्या आहेत. अमूल ताजा टोन्ड दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये, तर अमूल गोल्डच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मदर डेअरीनेही दुधाच्या किमतीत 2 ते 4 रुपयांची वाढ केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील गोकुळ दूधसंघाच्या दरवाढीचीही चर्चा सुरू आहे. संघाचे नवे चेअरमन राजेश पाटील यांनी दूध दरवाढीचे संकेत दिले आहेत. नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गोकुळच्या ग्राहकांनाही दूध महागाईचा फटका बसू शकतो.
ग्राहकांच्या बजेटवर परिणाम
दूध ही बहुतांश घरांतील रोजच्या वापरातील गरज आहे. त्यामुळे प्रतिलिटर काही रुपयांची वाढ झाली तरी महिन्याच्या खर्चात त्याची भर पडते. विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि दुग्धजन्य पदार्थांचा नियमित वापर करणाऱ्या कुटुंबांच्या बजेटवर याचा परिणाम होऊ शकतो. चारा, पशुखाद्य, पॅकेजिंग आणि वाहतुकीचा खर्च वाढत असल्याचं कंपन्यांकडून सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत दूध दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चात आणखी भर पडणार आहे.

