आयपीएल २०२७ च्या हंगामाआधी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून चर्चांना उधाण आलं आहे. हार्दिक पांड्या संघ सोडणार असल्याच्या चर्चांदरम्यान, रोहित शर्मा पुन्हा मुंबईचं नेतृत्व करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, या चर्चांवर मुंबई इंडियन्सच्या सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. रोहित शर्माला पुन्हा कर्णधार करण्याबाबत फ्रँचायझीमध्ये अद्याप कोणतीही अंतर्गत चर्चा झालेली नसल्याचं वृत्त आहे. मात्र रोहितच्या चाहत्यांनमध्ये आणि काही मीडिया रिपोर्टमध्ये रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपद मिळू शकतं अश्या चर्चा होत्या.

हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत काय अपडेट?

हार्दिक पांड्याच्या संभाव्य ट्रेडची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्ससारख्या संघांची नावं या चर्चेत समोर आली आहेत. मात्र, हार्दिकला दुसऱ्या संघात पाठवण्यासाठी मुंबई इंडियन्सला अद्याप योग्य ट्रेड डील मिळालेली नसल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आयपीएल २०२७ मध्ये हार्दिक मुंबईकडूनच खेळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अद्याप त्याच्या ट्रेडबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
रोहितऐवजी या खेळाडूंना मिळू शकते संधी

हार्दिक पांड्याने संघ सोडल्यास मुंबई इंडियन्ससमोर कर्णधारपदासाठी अनेक पर्याय असतील. वृत्तांनुसार, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे या शर्यतीतील प्रमुख दावेदार मानले जात आहेत. याशिवाय न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनर याचाही विचार होऊ शकतो. जसप्रीत बुमराचं नावही संभाव्य पर्यायांमध्ये चर्चेत आहे.
पुन्हा ‘हिटमॅन पर्व’ सुरू होणार?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे त्याला पुन्हा कर्णधारपद मिळणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, सध्या रोहितच्या पुनरागमनाबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे आयपीएल २०२७ साठी मुंबई इंडियन्सचं नेतृत्व कोण करणार, हार्दिक पांड्या संघात कायम राहणार का आणि रोहित शर्माची भूमिका काय असेल, याची उत्तरं फ्रँचायझीच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होतील.

