
राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट बसवण्याबाबत परिवहन विभागाने आता कडक भूमिका घेतली आहे. मुदत संपल्यानंतरही अनेक वाहनांवर HSRP प्लेट बसवण्यात आलेली नसल्याने अशा वाहनांची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागाकडून विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 84 हजार वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 98 लाख 08 हजार वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. मात्र, अजूनही मोठ्या संख्येने वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आलेली नाही.
रस्त्यावर वाहनांची तपासणी
HSRP नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने विशेष पथकं तयार केली आहेत. ही पथकं विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करणार आहेत. ज्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट नाही किंवा अनधिकृत नंबर प्लेट वापरली जात आहे, अशा वाहनांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनही HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?
HSRP म्हणजे High Security Registration Plate. ही अॅल्युमिनियमपासून तयार केलेली विशेष नंबर प्लेट असून वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस ती बसवली जाते. या प्लेटवर निळ्या रंगातील अशोकचक्राचा होलोग्राम, ‘IND’ चिन्ह आणि 10 अंकी लेझर-ब्रँडेड ओळख क्रमांक असतो. वाहनाच्या नोंदणी क्रमांकावर हॉट-स्टॅम्प फिल्मचा वापर केला जातो. HSRP प्लेट वाहनाच्या अधिकृत नोंदणीशी जोडलेली असल्याने ती दुसऱ्या वाहनावर वापरता येत नाही.

HSRP नंबर प्लेटचा फायदा काय?
HSRP नंबर प्लेटमुळे वाहनाची ओळख अधिक सुरक्षित करण्यास मदत होते. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेटचा वापर आणि वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होऊ शकतो. प्लेटवरील विशेष क्रमांक, होलोग्राम आणि इतर सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे वाहनाची ओळख पटवणे अधिक सोपे होते. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणांना वाहनांची तपासणी करण्यासही मदत होते. आता परिवहन विभागाने विशेष पथकं रस्त्यावर उतरवल्याने HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

