
महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी भाजप आमदास श्वेता महालेंनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीचा सन्मान आणि शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करण्यासाठी ही मागणी केल्याचे महाले यांनी म्हटले आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी
भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी केली आहे. या मागणीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेत प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीचा सन्मान म्हणून जिल्ह्याला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी भूमिका आमदार श्वेता महाले यांनी मांडली आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलं?

आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि पर्यटन महत्त्वाचा उल्लेख केला आहे. लोणार सरोवर, शेगाव, मेहकर येथील शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य आणि सैलानी बाबा दर्गा यांसारखी विविध धार्मिक आणि पर्यटनस्थळे जिल्ह्यात आहेत. तसेच सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊ यांची जन्मभूमी असल्याचे नमूद करत, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांची नावे बदलली
यापूर्वी महाराष्ट्रातील औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे करण्यात आले आहे. त्यानंतर आता बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी पुढे आली आहे.
‘शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करा’
ही मागणी करताना श्वेता महाले यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख केला आहे. जिजाऊंच्या जन्मभूमीला त्यांचे नाव दिल्यास देशभरातील शिवप्रेमींना आनंद होईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. महाले यांनी ही मागणी सोशल मीडियावरही शेअर केली असून, ‘राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मभूमीचा सन्मान आणि असंख्य शिवप्रेमींच्या भावनांचा आदर’ करण्यासाठी हा प्रस्ताव दिल्याचे म्हटले आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलण्याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. या मागणीवर शासनस्तरावर पुढील प्रक्रिया काय होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

