‘कॉकरोच जनता पार्टी’ अर्थात CJP सध्या निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नसल्याचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले आहे. त्याऐवजी सरकार आणि राजकीय व्यवस्थेवर जनतेच्या मुद्द्यांसाठी दबाव निर्माण करणारा प्रेशर ग्रुप म्हणून काम करण्याची भूमिका CJPने घेतली आहे. 6 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीनंतर संघटनेने आपल्या राष्ट्रीय टीमची घोषणा केली. या टीममध्ये वकील, चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनिअर, पत्रकार आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व सदस्यांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे.
CJPची सुरुवात मे 2026 मध्ये झाली. सर्वोच्च न्यायालयातील एका टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर सुरू केलेली ही मोहीम काही दिवसांत मोठ्या युवा चळवळीत बदलली. त्यानंतर शिक्षण, रोजगार, परीक्षा व्यवस्था आणि सरकारी संस्थांमधील उत्तरदायित्व यांसारखे मुद्दे CJPने पुढे आणले.

CJPचे 12 चेहरे कोण?
- अभिजीत दीपके : संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक
छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असलेले अभिजीत दीपके हे CJPचे संस्थापक आहेत. पत्रकारिता आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील अनुभव असलेल्या दीपके यांनी यापूर्वी आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीमसोबत काम केले होते. सध्या ते अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचे शिक्षण घेत आहेत. CJPच्या सुरुवातीपासूनच दीपके हे संघटनेचा प्रमुख चेहरा राहिले आहेत. मात्र, संघटना राजकीय पक्ष म्हणून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, सध्या देशात जनतेचा आवाज संघटित करून सरकारवर दबाव निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे.
- आशुतोष रांका : राष्ट्रीय प्रवक्ते आणि ‘पॉलिसी मॅन’
राजस्थानच्या जयपूरमध्ये जन्मलेले आशुतोष रांका यांनी IIT कानपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून सार्वजनिक प्रशासनाचा अभ्यास केला आहे. त्यांनी मुंबई आणि लंडनमध्ये काम केले असून सार्वजनिक धोरणांवर लेखनही केले आहे. CJPच्या संघटनात्मक विस्तारात रांका यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना संघटनेचा ‘पॉलिसी मॅन’ म्हणून पाहिले जात आहे. CJPने यापूर्वीही रांका, सौरव दास आणि विजेता दहिया यांना प्रवक्त्यांची जबाबदारी दिली होती.
- सौरव दास : मुख्य प्रवक्ते
सौरव दास हे शोध पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांसाठी काम केले आहे. वयाच्या 18व्या वर्षापासून RTIच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचे काम सुरू केल्याचा उल्लेख त्यांच्या प्रोफाइलमध्ये आहे. CJPच्या आंदोलनाच्या काळात सौरव दास यांच्यावर मुख्य प्रवक्त्याची जबाबदारी देण्यात आली.
- अजिंक्य शिंदे : राष्ट्रीय संघटना प्रभारी
अजिंक्य शिंदे यांच्याकडे CJPच्या राष्ट्रीय संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या पूर्वीच्या राजकीय कामाबाबत सोशल मीडियावर आम आदमी पक्षाशी संबंध असल्याचे दावे करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीविषयी सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहिती तुलनेने मर्यादित आहे. CJPमध्ये त्यांना संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे.
- दीपक बल्यान : उत्तर विभागाचे संघटनात्मक काम
दीपक बल्यान हे राजस्थानमधील अलवर येथील शेतकरी कुटुंबातून आले आहेत. शेतकरी आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी अनेक वर्षे काम केल्याची माहिती आहे. CJPच्या ग्राउंड मोबिलायझेशनमध्ये म्हणजेच स्थानिक पातळीवर संघटना आणि कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभारण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
- आफरीन नवाज : राष्ट्रीय सचिव
आफरीन नवाज यांनी MBAचे शिक्षण घेतले असून कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर विद्यार्थी आणि सामाजिक प्रश्नांशी संबंधित कामात सक्रिय झाल्या. CJPच्या जंतर-मंतर आंदोलनादरम्यान त्या महिला कोअर टीमचा भाग होत्या.
- विजय रेड्डी मल्लंगी : दक्षिण विभाग
विजय रेड्डी मल्लंगी यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केले आहे. कम्युनिटी डेव्हलपमेंट आणि पर्यावरणाशी संबंधित उपक्रमांमध्ये ते सहभागी राहिले आहेत. CJPच्या दक्षिण भारतातील संघटनात्मक विस्ताराची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
- रत्ना सिंह : कायदेशीर विभाग
रत्ना सिंह या वकील असून त्यांनी यापूर्वी कायदेशीर पत्रकारिता केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांशी संबंधित वृत्तांकनाचा त्यांना अनुभव आहे. CJPच्या आंदोलनादरम्यान कायदेशीर बाबी आणि आंदोलकांशी संबंधित प्रकरणांमध्ये त्या काम करत होत्या.
- वैष्णवी गौर : संशोधन आणि धोरण
वैष्णवी गौर यांना सार्वजनिक धोरण आणि संशोधनाचा अनुभव आहे. केंद्र सरकारशी संबंधित विविध संस्था आणि थिंक टँक्ससोबत त्यांनी काम केल्याचे सांगितले जाते. CJPमध्ये संशोधन आणि धोरणविषयक कामात त्यांची भूमिका आहे.
- रोहन देशपांडे : तंत्रज्ञान विभाग
रोहन देशपांडे यांच्याबाबत सार्वजनिकरीत्या फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार त्यांना तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रात रस आहे. CJPच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कामात त्यांची भूमिका असल्याचे सांगितले जाते.
- योगेश इंगळे : आर्थिक व्यवहार
योगेश इंगळे हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अभिजीत दीपके यांच्यासोबत त्यांची अनेक वर्षांची मैत्री असल्याचे सांगितले जाते. CJPच्या आंदोलनाच्या काळात आर्थिक व्यवहार, कार्यक्रमांचे नियोजन, स्वयंसेवकांची व्यवस्था आणि इतर व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळल्याची आहे.
- अंकित भारद्वाज : आर्थिक आणि संघटनात्मक काम
अंकित भारद्वाज हे व्यवसायाने CA असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पूर्वीच्या राजकीय संबंधांबाबत सोशल मीडियावर विविध दावे आहेत. मात्र, या दाव्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी सर्व बाबतीत उपलब्ध नाही.
CJP राजकीय पक्ष का बनत नाही?

CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले आहे की, संघटना सध्या निवडणुका लढवण्याच्या किंवा राजकीय पक्ष बनण्याच्या तयारीत नाही. त्याऐवजी ती प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार आहे. प्रेशर ग्रुप म्हणजे स्वतः निवडणूक न लढवता सरकार, प्रशासन आणि राजकीय पक्षांवर जनतेच्या मागण्यांसाठी दबाव निर्माण करणारी संघटना. CJPच्या मते, सध्याच्या राजकीय वातावरणात थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर संघटन उभारणे अधिक महत्त्वाचे आहे.
‘क्या बोलती पब्लिक’ अभियानातून देशभर विस्तार

CJP आता ‘क्या बोलती पब्लिक’ या नावाने देशव्यापी अभियान सुरू करणार आहे. 1 सप्टेंबरपासून CJPचे नेते देशभर प्रवास करून तरुणांशी संवाद साधणार असून सदस्य नोंदणी मोहीम राबवणार आहेत. शिक्षण, रोजगार, संस्थांची जबाबदारी आणि राजकीय उत्तरदायित्व यांसारखे मुद्दे या अभियानाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. CJPने यापुढे पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही आपल्या अभियानाच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे संघटना केवळ शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेपुरती मर्यादित न राहता व्यापक राजकीय प्रश्नांवर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
2029 मध्ये CJP कोणाला धक्का देणार?

हा सध्या सर्वात मोठा राजकीय प्रश्न आहे. CJPने निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी त्याचा प्रभाव वाढल्यास त्याचा परिणाम सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही आघाड्यांवर होऊ शकतो. CJP भविष्यात राजकीय पक्ष बनला आणि सत्तेविरोधातील मतांचे विभाजन झाले, तर त्याचा थेट फटका विद्यमान विरोधी पक्षांना बसू शकतो. विशेषतः तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये CJPने आपला प्रभाव निर्माण केला तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहू शकते.
दुसरीकडे, CJP प्रेशर ग्रुप म्हणूनच कायम राहिला आणि शिक्षण, रोजगार, भ्रष्टाचार, संस्थांची स्वायत्तता यांसारख्या मुद्द्यांवर सरकारविरोधात जनमत तयार केले, तर त्याचा राजकीय दबाव सत्ताधारी NDAवर पडू शकतो.
म्हणूनच CJP सध्या निवडणूक लढवत नसले तरी 2029च्या राजकारणात त्याची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. मात्र, कोणत्या पक्षाला प्रत्यक्ष किती नुकसान किंवा फायदा होईल, हे सध्या निश्चित सांगणे शक्य नाही. CJPची संघटनात्मक ताकद, सदस्यसंख्या आणि प्रत्यक्ष मैदानातील प्रभाव आगामी काळात किती वाढतो, यावर त्याचा राजकीय परिणाम अवलंबून असेल.

