यूट्यूबवर भारतीय क्रिएटर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याचवेळी प्लॅटफॉर्मच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्हिडिओंची संख्याही वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर यूट्यूबने भारतीय व्हिडिओंवर मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते जून 2026 या तीन महिन्यांत भारतातून अपलोड झालेले तब्बल 34.4 लाख व्हिडिओ यूट्यूबने कायमस्वरूपी डिलीट केले आहेत.

जगभरात या काळात एकूण 1.1 कोटी व्हिडिओ हटवण्यात आले. त्यापैकी जवळपास 31 टक्के व्हिडिओ एकट्या भारतातील होते. मागील तिमाहीच्या तुलनेत भारतातील डिलीट झालेल्या व्हिडिओंच्या संख्येत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आकडेवारीनुसार भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतानंतर अमेरिकेचा नंबर लागतो. अमेरिकेतून अपलोड झालेले 12.4 लाख व्हिडिओ हटवण्यात आले, तर इंडोनेशियातील 9.2 लाख व्हिडिओ डिलीट करण्यात आले. एखादा व्हिडिओ कोणत्या देशातून अपलोड झाला आहे, हे यूट्यूब अपलोड करणाऱ्या व्यक्तीच्या आयपी ॲड्रेसवरून ठरवतं.
बहुतेक व्हिडिओ एआयच्या मदतीने शोधले

यूट्यूबने भारतातील कोणत्या प्रकारचे व्हिडिओ सर्वाधिक हटवले, याची माहिती दिलेली नाही. मात्र, जगभरात डिलीट झालेल्या व्हिडिओंपैकी 68.2 टक्के व्हिडिओ मुलांच्या सुरक्षेसंबंधी नियमांचं उल्लंघन करत होते. विशेष म्हणजे, यापैकी 98.6 टक्के व्हिडिओ यूट्यूबच्या ऑटोमेटेड एआय सिस्टमने शोधले होते.
भारतातून कंटेंट हटवण्याच्या मागण्याही वाढल्या

यूट्यूबवर फक्त कंपनीच्या नियमांमुळेच नाही, तर सरकारी यंत्रणा आणि कोर्टाच्या तक्रारींमुळेही कंटेंट हटवला जात आहे. जानेवारी ते जून 2026 दरम्यान गुगलला भारतातून कंटेंट हटवण्यासाठी 4006 रिक्वेस्ट मिळाल्या. त्यापैकी 3399 रिक्वेस्ट यूट्यूबशी संबंधित होत्या. मागील सहा महिन्यांच्या तुलनेत अशा मागण्यांमध्ये 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या रिक्वेस्टमध्ये एकूण 65,091 कंटेंट हटवण्याची मागणी करण्यात आली. यातील 72 टक्के मागण्या पोलिसांकडून, तर 695 रिक्वेस्ट कोर्टाकडून आल्या. सर्वाधिक तक्रारी मानहानीशी संबंधित होत्या. अशा 2130 रिक्वेस्टमध्ये कंटेंट अपमानजनक असल्याचं सांगत तो हटवण्याची मागणी करण्यात आली.